Join us
Daily Top 2Weekly Top 5

पल्स परिषदेत ७२० कोटींचे सामंजस्य करार : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 07:17 IST

एकूण १५ सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना दिली

मुंबई : ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने राज्याने आरोग्य क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. पल्स परिषदेत ७२० कोटी रुपये गुंतवणुकीचे तीन सामंजस्य करार करण्यात आले असून, एकूण १५ सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना दिली. या परिषदेमुळे आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण, वैद्यकीय तंत्रज्ञान व संशोधन आणि नवकल्पनांना चालना मिळाल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.

जिओ वर्ल्ड सेंटर येथे फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी कार्यक्रमाच्या समारोपानंतर पत्रकारांशी संवाद साधला.  सामंजस्य करारांपैकी १२ करार धोरणात्मक भागीदारीचे आहेत. परिषदेत १० हून अधिक देशांमधील १३० पेक्षा जास्त तज्ज्ञ आणि ३००० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला. उद्योग विभागामार्फत करण्यात आलेल्या करारांमध्ये ‘बल्क ड्रग्ज पार्क’साठी सॅव्वी केअर आणि फार्मॅक्स या कंपन्यांकडून एकत्रित ५२० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. तसेच निप्रो फार्मा पॅकेजिंग कंपनीने २०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार केला आहे. यामुळे  औषधनिर्माण क्षेत्र बळकट होणार आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत ११ करार करण्यात आले असून, त्यात रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स ऑफ ग्लासगो आणि युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स यांच्याबरोबर वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षणासाठी सहकार्य करार करण्यात आले, असे फडणवीस यांनी सांगितले. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीस