Join us
Daily Top 2Weekly Top 5

मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 11:38 IST

आपल्या प्रत्येक आनंदामागे तिचे कष्ट आणि प्रत्येक यशामागे तिचे आशीर्वाद असतात. लहानपणी आपल्याला चालायला शिकवणारी आई, मोठेपणी जीवनाचा मार्गही दाखवते. स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून ती मुलांच्या स्वप्नांसाठी जगत असते.

Mother's Day: आई म्हणजे प्रेमाचा अथांग सागर, त्यागाची मूर्ती आणि आयुष्यभर साथ देणारी सावली. आपल्या प्रत्येक आनंदामागे तिचे कष्ट आणि प्रत्येक यशामागे तिचे आशीर्वाद असतात. लहानपणी आपल्याला चालायला शिकवणारी आई, मोठेपणी जीवनाचा मार्गही दाखवते. स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून ती मुलांच्या स्वप्नांसाठी जगत असते. मातृदिन हा फक्त एक दिवस नसून आईच्या निस्वार्थ प्रेमाला सलाम करण्याचा क्षण. जगभरात हा दिवस मातृत्वाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. आईच्या मायेची किंमत कोणत्याही भेटवस्तूमध्ये मोजता येत नाही. तिच्यासाठी सर्वांत मोठी भेट म्हणजे मुलांचे प्रेम, आदर आणि तिच्या चेहऱ्यावरचे हसू, अनेकदा आई स्वतःच्या वेदना लपवून कुटुंबाला आनंद देत असते. त्यामुळे मातृदिनाच्या निमित्ताने तिच्या त्यागाची जाणीव ठेवून तिला एक प्रेमळ मिठी आणि मनापासून "धन्यवाद आई" म्हणणे हेच खरे तिच्यासाठी अमूल्य भेट ठरते. रविवारी, दि. १० मे रोजी साजरा करण्यात येणाऱ्या मातृदिनाच्या निमित्ताने काही मान्यवरांनी त्यांच्या आईच्या आठवणींना दिलेला हा उजाळा...

आई ही यशाच्या शिखरापर्यंत नेणारी प्रचंड 'ऊर्जास्रोत'

माझ्या आईचे जीवन हे कष्ट, त्याग आणि अढळ विश्वासाचे प्रतीक आहे. तिने कुटुंबासाठी स्वतःला विसरून ज्या समर्पण भावनेने आणि सकारात्मकतेने आयुष्य व्यतीत केले ते मला नेहमी प्रेरणा देते. मी आज जो काही आहे तो तिच्या या गुणांमुळे. मी शाळेत अनेकदा परीक्षांमध्ये नापास झालो. या अपयशामुळे नैराश्यात जात असे; पण आईने अपयशाला सामोरे जायला शिकवले. तिने माझ्या पाठीवर थोपटून सांगितलेले माझ्या मनावर आजही कोरले आहे. ती म्हणाली होती, 'अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, हार मानू नकोस.' तिच्या त्या शब्दांनी मला पुन्हा उभे राहण्याची ताकद मिळाली. अभ्यासाची प्रेरणा तिच्याकडून मिळाली. मी यशाकडे वाटचाल केली. आयुष्यात यशस्वी झालो. माझ्या आईचे असीम प्रेम, मार्गदर्शन आणि त्यागामुळेच यशाची पायरी चढणे शक्य झाले आहे. मी तिचा कायम ऋणी राहीन. मातृदिनाच्या निमित्ताने जगभरातील सर्व मातांना हार्दिक शुभेच्छा! तुमचे प्रेम आणि त्यागच या जगाला चालवत आहे.
-डॉ. संजय मुखर्जी (आयुक्त, एमएमआरडीए)

आईचा मोलाचा संस्कार वारसा हे माझ्या जीवनातील मोठे लेणे !

एकीकडे आई म्हणून मायेची पाखर आणि शिस्तीचा बडगा; तर दुसरीकडे मैत्रीण म्हणून हळुवार हितगुज. या दुहेरी नात्याने मी आईशी लहानपणापासून बिलगून आहे. तिला महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करता आले नाही; पण तिची स्वप्ने तिच्या मुलींना पूर्ण करता यावीत यासाठी आम्हा तिघी बहिणींच्या मागे ती ठाम उभी राहिली. माझे लहानपण ग्रामीण आणि निमशहरी भागात गेले. मुलगी म्हणून घरकामाची जबाबदारी न टाकता विद्यार्जन आणि अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर कौशल्ये आत्मसात करण्यासाठी तिने प्रोत्साहन दिले. दहावीत बोर्डात आल्यानंतर कलाशाखेला जाण्याचा निर्णय असो किंवा आयएएस अधिकारी बनण्याची स्वप्ने असोत... हे सर्व आईचा बिनशर्त पाठिंबा आणि ठाम विश्वास यांमुळेच साध्य झाले. तिचा निर्मळ प्रामाणिकपणा, अतिकष्ट घेण्याची तयारी आणि कोणत्याही गोष्टीसाठी झोकून देऊन काम करणे, हे बघतच मी लहानाची मोठी झाले. माणसे जोडणे, सर्वांशी उत्तम संवाद साधणे आणि कुटुंबातील सर्व पिढ्यांचा दुवा बनून नव्या पिढीशीही जोडता येणे, हे तिच्याकडूनच शिकावे. तिने दिलेला हा वारसा हे माझे मोठे लेणे आहे.
-अश्विनी भिडे (आयुक्त, मुंबई महापालिका)

संकटावर मात करत दिशा देणारी 'लिज्जतची माऊली'

बार्शी परिसरातील गौडगाव-उपळे या 66 खेडेगावातून काम मिळविण्याच्या विवंचनेत आलेल्या वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर आईने श्री महिला उद्योग संस्थेत सहा महिलांना घेऊन पापड लाटण्यासाठी नाव नोंदविले. पुढे आई त्याच लिज्जत पापड केंद्राची संचालिका झाली. कामाचे ठिकाण ही केवळ पैसे कमावण्याची जागा नसून ते मंदिर आहे, तेथे श्रद्धेने काम करा, असे ती सांगायची. गांजलेल्या, प्रसंगी व्यसनाधीन पुरुषांच्या हातातील खेळणे बनलेल्या बायकांना तिने हिंमत दिली. संकटकाळी एक वेळ पुरुष हतबल होतो; पण स्त्री हतबल झाल्याचे उदाहरण नाही, हा तिचा विश्वास अनेक स्त्रियांसाठी प्रेरणादायी ठरला. महिलांना बचतीचे महत्त्व पटवून दिले होते. पण महिला बँक काढण्याची तिची इच्छा अपुरीच राहिली. आदिशक्ती पुरस्कार मिळाला, त्याच दिवशी सकाळी तिला कॅन्सर झाल्याचे समजले होते. मात्र संध्याकाळच्या कार्यक्रमात भरभरून बोलली. ज्यांच्याकडून कटू अनुभव आले, त्यांच्याशी कुटुंबीयांचे संबंध बिघडू नयेत, हा उदात्त भाव तिच्या मनी होता.
-विद्याधर अनास्कर (सहकारी बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ)

आईच्या 'त्या' धीरोदात्त शब्दांनी दिली लढण्याची ताकद

माझी आई कोल्हापूरची. मी लहान असताना, क्रांतिसिंह नाना पाटील यांचे 'पत्री सरकार' चालत असे. प्रामुख्याने सातारा, सांगली, कोल्हापूर या भागांत ब्रिटीशविरोधी कारवाया खूप होत असत. माझी आई विमलादेवी आणि मामा एम. आर. देसाई हेदेखील स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होत. आई त्यावेळी गाद्यांमध्ये पिस्तुले भरायचे काम करत असे. आई मुळातच खूप धाडसी होती. माझ्या लहानपणी ती मला नेहमी छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे शौर्य, लढाया, इतिहासातील गोष्टी सांगायची. १९९३ मधील मुंबई बॉम्बस्फोट खटल्याची जबाबदारी राज्य सरकारने माझ्यावर सोपवली. अतिरेक्यांशी संबंधित खटला असल्याने मी मुंबईला यायला थोडा कचरत होतो. पण आईने मला 'न घाबरता जा, देशाचे काम आहे' असे ठणकावून सांगितले. तेव्हापासून न घाबरणे, आत्मविश्वास आणि स्पष्ट बोलणे हे गुण माझ्या अंगात भिनले. त्यांनतर मी आठ दिवस इस्लामाबादलाही जाऊन आलो आणि कसलीही भीती वाटली नाही. आईने माझ्या मनातील भीती घालवली. आज आई नाही, पण तीची आठवण कायम माझ्या हृदयात आहे.
-अॅड. उज्ज्वल निकम (खासदार, ज्येष्ठ विधिज्ञ)

जेव्हा आईसाठी काळजाचा ठोका चुकला होता...

आईचा किंवा वडिलांचा कुठलाही एक दिवस असूच शकत नाही. प्रत्येक परिवारात अशा काही घटना घडतात, जेव्हा आईचे असणे म्हणजे काय, तिचे अस्तित्व म्हणजे ते समजते. २००६-०७ च्या दरम्यानची गोष्ट आहे. एका बिकट परिस्थितीला आम्ही सगळे सामोरे जात होतो. प्रत्येक शनिवार-रविवारी आई-बाबांना बोरिवलीच्या घरी थोडे थोडे सामान घेऊन जायचो. तसे एकदा सामान ठेवून गिरगावात परतलो होतो. गाडीतून उतरलो, गाडी पार्क केली आणि घरी जात होतो. त्यावेळी आई बाबांना म्हणाली, छातीत थोडंसं दुखत आहे. बाबांनी लगेच फॅमिली डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांनी रिपोर्टस् काढायला सांगितले. त्यांनतर डॉक्टरांनी सांगितलेले ऐकून पायाखालची जमीनच सरकली. आईला 'माइल्ड अटॅक' येऊन गेला होता. ते ऐकून काही सुचेना. आई काहीतरी होतेय असे म्हणाली आणि बाबा सहज तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले म्हणून वेळीच उपचार करता आले. पण त्यावेळी आईची परिस्थिती पाहून मी मात्र गर्भगळित झालो होतो.
-स्वप्निल जोशी,  अभिनेता

English
हिंदी सारांश
Web Title : Mother's Day: A tribute to the selfless love and sacrifice of mothers.

Web Summary : Mother's Day honors mothers' selfless love and sacrifices. Celebrities share touching memories, highlighting their mothers' strength, guidance, and unwavering support in overcoming challenges and achieving success. A heartfelt 'Thank you, Mother' is the most precious gift.
टॅग्स :मदर्स डेउज्ज्वल निकमअश्विनी भिडेस्वप्निल जोशी