लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोणतीही आई मुलाला मारहाण करणार नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने ७ वर्षांच्या मुलाला मारहाण केल्याप्रकरणी साथीदारासह अटक केलेल्या आईला जामीन मंजूर केला.
तक्रारदार असलेले वडील आणि आरोपी असलेली आई यांच्यातील वैवाहिक वादात मुलाला त्रास होत आहे आणि त्याला बळीचा बकरा बनविण्यात आले आहे, असे निरीक्षण न्या. मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने नोंदविले. मुलाच्या वैद्यकीय अहवालावरून असे दिसते की, मुलाला अपस्मार आणि फेफरे येते. तो कुपोषित आणि अशक्त आहे. मुलाची काळजी घेण्यासाठी आणि त्याला आधार देण्यासाठी आईने त्रास सहन केल्याचे कागदपत्रांवरून आढळते, असे न्यायालयाने नमूद केले.
वडिलांची तक्रारमहिलेला ऑक्टोबर २०२३ मध्ये अटक करण्यात आली. वडिलांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आईवर गुन्हा दाखल केला. पत्नीने साथीदाराने सात वर्षांच्या मुलाला अनेकदा मारहाण केली. एकदा त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तर विभक्त पत्नीच्या साथीदाराने मुलाचे एकदा लैंगिक शोषणही केले, असे तक्रारीत म्हटले आहे.
न्यायालयाचे निरीक्षणप्रथमदर्शनी सर्व आरोप अविश्वसनीय आहेत. कोणतीही आई स्वत:च्या मुलाला मारहाण करण्याचा विचार करू शकत नाही,’ असे म्हणत न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर महिलेची सुटका केली. पोलिसांनी महिलेला अटक करताना तिला अटकेची कारणे दिली नाहीत. कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत, असेही न्यायालयाने म्हटले.