आईनेच घडवून आणली मुलाची हत्या
By Admin | Updated: December 12, 2015 01:55 IST2015-12-12T01:55:10+5:302015-12-12T01:55:10+5:30
मैत्रीमध्ये विरोध करणाऱ्या पोटच्या पोराची मित्राच्या मदतीने हत्या करविणाऱ्या एका ५५ वर्षांच्या महिलेला शुक्रवारी बांगूरनगर पोलिसांनी अटक केली.

आईनेच घडवून आणली मुलाची हत्या
मुंबई : मैत्रीमध्ये विरोध करणाऱ्या पोटच्या पोराची मित्राच्या मदतीने हत्या करविणाऱ्या एका ५५ वर्षांच्या महिलेला शुक्रवारी बांगूरनगर पोलिसांनी अटक केली. मात्र ही हत्या करणारा तिचा मित्र आणि त्याचा एक साथीदार हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
रोनाल्ड डिसोजा (३१) यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह मंगळवारी त्यांच्या मालाडमधील घरात सापडला. त्यांची आई सिसलिया हिनेच या प्रकरणी पोलीस नियंत्रण कक्षात फोन करून याबाबत पोलिसांना कळविले होते. मात्र तपासादरम्यान सिसलिया हिनेच तिच्या अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या रोनाल्डचा काटा काढल्याची माहिती उघड झाल्याचे परिमंडळ अकराचे पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांनी सांगितले. सिसलिया हिची तिचा कारचालक भरत वोली (२५) याच्यासोबत गेल्या दीड वर्षापासून मैत्री होती. अनेकदा ती त्याच्यासोबत फिरण्यासाठी बाहेरही जायची. ही बाब जेव्हा रोनाल्डला समजली तेव्हा त्यांच्यात याच कारणावरून वाद होऊ लागले. त्यामुळे सिसलियाने भरतसोबत मिळून रोनाल्डचा काटा काढला. चौकशीत तिने हा गुन्हा कबूल केला. त्यानुसार तिला अटक करण्यात आली. मात्र भारत आणि त्याचा साथीदार दीपक हे अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत असल्याचे बांगूरनगर पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)