माथेफिरूच्या हल्ल्यात रुग्ण ठार
By Admin | Updated: May 13, 2014 05:17 IST2014-05-12T20:56:38+5:302014-05-13T05:17:40+5:30
माथेफिरू रूग्णाचा रूग्णांवर प्राणघातक हल्ला एक रूग्ण ठार बॉॅम्बे हॉस्पीटलमध्ये पहाटे घडला थरार,मेंदूचा क्षय आणि अन्य दुर्धर रोगाची लागण झालेल्या एका माथेफिरू रूग्णाने अचानक रूग्णालयाच्या वॉर्डमधील तिघांवर प्राणघातक हल्ला केला.

माथेफिरूच्या हल्ल्यात रुग्ण ठार
मुंबई दि. १२ (प्रतिनिधी)
मेंदूचा क्षय आणि अन्य दुर्धर रोगाची लागण झालेल्या एका माथेफिरू रूग्णाने अचानक रूग्णालयाच्या वॉर्डमधील तिघांवर प्राणघातक हल्ला केला. त्यात एक रूग्ण ठार झाला. हा भीषण थरार पहाटे साडेसहाच्या सुमारास बॉम्बे रूग्णालयाच्या जनरल वॉर्डमध्ये रंगला. एका रूग्णाने अन्य रूग्णांवर अशाप्रकारे प्राणघातक हल्ला करणे आणि त्यात जीवीत हानी होणे ही मुंबईतली पहिलीच घटना असावी.
परिमंडळ एकचे उपायुक्त राजेंद्र शिसवे यांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर रूग्णाचे नाव शहाबुददीन मोहबली तालुकादार(४२) असे आहे. शहाबुददीन आग्रीपाडयाचा रहिवासी असून मंदूतील क्षय आणि अन्य दुर्धर रोगावरील उपचारांसाठी तो ८ मे रोजी बॉम्बे रूग्णालयात दाखल झाला. त्याला जनरल वॉर्डमध्ये दाखल करून घेण्यात आले होते. त्याच्या विविध चाचण्या सुरू होत्या.
पहाटे सहाच्या सुमारास शहाबुददीन शौचालयात गेला. तेथून परतताच अचानक तो हिंसक झाला. खाटेजवळील सलाईनचा स्टॅण्ड हाती घेऊन तो आसपासच्या रूग्णांवर धावून गेला. कर्करोगावरील उपचारांसाठी याच वॉर्डमध्ये दाखल असलेले लिलाबिहारी गोवर्धन ठाकूर हे शहाबुददीनचे पहिले लक्ष्य ठरले. शहाबुददीनने ठाकूर यांच्या डोक्यात आणि चेहेर्यावर अवजड लोखंडी स्टॅण्डचे घाव घातले. ठाकूर यांना रक्तांच्या थारोळयात सोडून शहाबुददीनने आपला मोर्चा प्रफुलचंद लिवनलाल परमार या रूग्णाकडे वळवला. त्यांच्याही डोक्यात स्टॅण्डचे घाव घालून शहाबुददीन तिसर्या रूग्णाकडे वळला.
मात्र वॉर्डातच थांबलेले या रूग्णाचे नातेवाईक जनार्दन आरते यांनी शहाबुददीनला रोखण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये बाचाबाचीही झाली. मात्र शहाबुददीनपुढे त्यांची ताकद अपुरी पडली. अखेर शहाबुददीनने आरते यांनाही लोखंडी स्टॅण्डने जखमी केले. तोवर वॉर्डातल्या नर्स, वॉर्डबॉय आणि रूग्णांच्या नातेवाईकांनी शहाबुददीनच्या मुसक्या आवळल्या आणि पाच मिनिटे जनरल वॉर्डात सुरू असलेला भीषण थरार थांबला.
पहाटेची वेळ असल्याने जनरल वॉर्डमध्ये तितकी जाग नव्हती. बहुतांशी रूग्ण किंवा त्यांचे नातेवाईक गाढ झोपेत होते. त्यामुळे सुरूवातीला काय घडते आहे याची जाणीव वॉर्डमधील बहुतेकांना नव्हती. मात्र फटक्यांचा आवाज आणि पाठोपाठ कानी पडलेल्या किंकाळया, विव्हळणे एकून सारेच जागे झाले. समोर घडणारा, घडून गेलेला प्रकार पाहून सार्यांनाच धक्का बसला, अशा प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिलेल्या जबाबातून पुढे आल्या आहेत.
या हल्ल्यात ठाकूर, परमार आणि अर्टे तिघेही गंभीर जखमी झाले. त्यापैकी ठाकूर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अन्य दोघांवर बॉम्बे रूग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
आझाद मैदान पोलिसांनी शहाबुददीनविरोधात सुरूवातीला हत्येचा प्रयत्न असा गुन्हा नोंदविला होता. मात्र ठाकूर यांच्या मृत्यूनंतर हत्येचे कलम गुन्हयात वाढविण्यात आले. प्रत्यक्षदर्शींचे जाबजबाब नोंदवून घटना कशी घडली हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे उपायुक्त शिसवे यांनी सांगितले.
माथेफिरू रूग्ण जेजेत
हल्ल्यानंतर आरोपी रूग्ण शहाबुददीनला तात्काळ जेजे रूग्णालयाच्या मानसोपचार विभागात हलविण्यात आले. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंद झाला असला तरी रात्री उशिरापर्यंत त्याला अटक करण्यात आलेली नव्हती. याबाबत उपायुक्त राजेंद्र शिसवे यांनी सांगितले की, आरोपी मानसिक, शारिरिकदृष्टया पोलीस चौकशीसाठी, जबाब देण्यासाठी सक्षम आहे का हे जेजेतल्या डॉक्टरांकडून जाणून घेतल्यानंतरच पुढली कारवाई केली जाईल. तसेच गेल्या चार दिवसात आरोपी रूग्णावर उपचारांसाठी अनेक चाचण्या झाल्या. या चाचण्यांदरम्यान त्याचे वागणे कसे होते, तो अशाप्रकारे अचानक आक्रमक, हिंसक बनला होता का हेही जाणून घेतले जात आहे.
हल्ला नैराश्येतून?
क्षय आणि अन्य दुर्धर आजार यातून कधीच बरा होणार नाही या विचाराने शहाबुददीन नैराश्येच्या गर्तेत असावा आणि त्यातूनच त्याने हा हल्ला केला असावा, असा अंदाज पोलीस वर्तवित आहेत.