Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत अतिजोखमीच्या आजारांचे सर्वाधिक बळी; उच्च रक्तदाब, मधुमेहींनी काळजी घेणे गरजेचे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 02:03 IST

मुंबईत कोरोनामुळे झालेल्या एकूण १० हजार ७३९ मृत्यूंपैकी ५५ टक्के मृत्यू उच्च रक्तदाबामुळे, तर ५० टक्के मधुमेहामुळे झाले.

मुंबई : मुंबईमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये अतिजोखमीचे आजार असलेल्या रुग्णांचे सर्वाधिक बळी गेले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्थूलता, अस्थमा असे आजार असणाऱ्या व्यक्तींनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मत टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी मांडले.

मुंबईत कोरोनामुळे झालेल्या एकूण १० हजार ७३९ मृत्यूंपैकी ५५ टक्के मृत्यू उच्च रक्तदाबामुळे, तर ५० टक्के मधुमेहामुळे झाले. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या आणि हिवाळ्याचे बदलते वातावरण याच्या पार्श्वभूमीवर मृत्युदर कमी करण्यासाठी अधिक काळजी घेतली पाहिजे, असे मत टास्क फोर्सचे तज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले.

दरम्यान, दिवाळीपूर्व उतरणीला आलेला कोरोनाचा आलेख दिवाळीनंतर पुन्हा वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर महापालिकेने एकीकडे चाचण्यांची संख्या वाढविली आहे. साेबतच दुसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर ८३ हजार अतिजोखमीच्या रुग्णांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

गुंतागुंत निर्माण हाेण्याची भीतीअतिजोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्यास गुंतागुंत निर्माण होऊ शकते. शिवाय, कोरोनामुक्त झाल्यानंतरही पूर्ण बरे वाटेपर्यंत अधिक काळ जावा लागतो. त्यामुळे अतिजोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्तींनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, स्वच्छता, सॅनिटायझरचा वापर करणे या सवयी कटाक्षाने अंगीकारल्या पाहिजेत, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या