Join us

कोकण विभागात सर्वाधिक वीजचोरी; भरारी पथकांद्वारे चोरी पकडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 07:02 IST

६३ भरारी पथकांनी कार्यकारी संचालक प्रमोद शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी केली.

मुंबई : महावितरणच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाने डिसेंबर महिन्यात केलेल्या धडक कारवाईत राज्यात वीजचोरीच्या ८७९ प्रकरणांत ११ कोटी ६९ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. ६३ भरारी पथकांनी कार्यकारी संचालक प्रमोद शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी केली.

वीजचोरी पकडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे तर वीजचोरीशिवाय इतर अनियमितता असलेल्या एकूण ५३९ प्रकरणांमध्ये १३ कोटी ६७ लाख ६० हजार रुपयांची वीजदेयकेही देण्यात आली. सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाने डिसेंबर महिन्यात केलेल्या कारवाईमध्ये ही प्रकरणे उघड झाली.नऊ महिन्यांत ८६ कोटींची वीजचोरी पकडली.

  • पुणे : वाघोली येथे दोन स्टोन क्रशरची वीजचोरी उघडकीस आली. त्यांना १ कोटी ४४ लाख रुपयांचे वीजचोरीचे बिल देण्यात आले. दोन्ही औद्योगिक ग्राहकांवर फिर्याद दाखल करण्यात आली.  
  • उल्हासनगर : औद्योगिक ग्राहकास ३१ लाख ६५ हजार रुपयांचे वीजचोरीचे बिल दिले.
  • जालना : एका स्टोन क्रशरची वीजचोरी उघडकीस आली. ५१ लाख रुपयांचे वीजचोरीचे बिल देण्यात आले. फिर्यादही दाखल करण्यात आली.

सर्व मुख्य अभियंत्यांना वीजचोरी रोखण्यासाठी आक्रमकपणे कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. भरारी पथकाखेरीज स्थानिक कर्मचाऱ्यांनाही सजगपणे वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणण्याचा व कारवाई करण्याचा आदेश दिला. प्रत्येक सर्कल पातळीवर याबाबत पाठपुरावा करण्याचाही आदेश देण्यात आला आहे.- विजय सिंघल, अध्यक्ष, महावितरण

एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत भरारी पथकांमार्फत एकूण ६,८०१ प्रकरणे उघडकीस आणली. त्यामध्ये ८६ कोटी १० लाख रुपयांची वीजचोरी पकडण्यात आली. याखेरीज इतर अनियमितता असलेल्या एकूण ६३३६ प्रकरणांमध्ये १६७ कोटी ११ लाख रुपयांची देयके देण्यात आली.

टॅग्स :महावितरणवीज