डास निर्मूलनच्या मोहिमेचा फज्जा
By Admin | Updated: November 17, 2014 00:18 IST2014-11-17T00:18:22+5:302014-11-17T00:18:22+5:30
कीटकनाशक फवारणीच्या कामाकरिता पालिकेचे २४९ पैकी १२५ कर्मचारीच कार्यरत असल्याने या मोहिमेचा फज्जा उडाल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक फरीद कुरेशी यांनी केला आहे.

डास निर्मूलनच्या मोहिमेचा फज्जा
भार्इंदर - कीटकनाशक फवारणीच्या कामाकरिता पालिकेचे २४९ पैकी १२५ कर्मचारीच कार्यरत असल्याने या मोहिमेचा फज्जा उडाल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक फरीद कुरेशी यांनी केला आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी उर्वरित कर्मचाऱ्यांनाही या मोहिमेत समाविष्ट करून शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ती राबविण्याची मागणी त्यांनी आयुक्त सुभाष लाखे यांच्याकडे केली आहे.
पालिकेने २०१४-१५ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात डास निर्मूलन मोहिमेसाठी केवळ दीड कोटीची तरतूद केली आहे. ती तुटपुंजी ठरत असल्याने वर्षभर राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत प्रभावी औषध कमी प्रमाणात वापरण्यात येत आहे. त्यातच नॅशनल वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम व राज्य शासनाच्या इनडोअर रेसिड्यूअल स्प्रे सिस्टीम या योजनांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आरोग्य विभागाकडून कार्यप्रणालीची अंमलबजावणी होत नाही.
परिणामी, शहरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. शिवाय, आरोग्य विभागात नियुक्त करण्यात आलेल्या २४९ कर्मचाऱ्यांपैकी केवळ सुमारे १२५ कर्मचारीच या विभागात कार्यरत असल्याने डास निर्मूलन मोहीम फत्ते होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)