राज्यात आयटीआयसाठी अडीच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:11 IST2021-09-02T04:11:21+5:302021-09-02T04:11:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम आणि स्वयंरोजगाराची हमी मिळत असल्याने दरवर्षी आयटीआयसाठी उपलब्ध जागांच्या दुपटीने अर्ज येतात. यंदाही ...

राज्यात आयटीआयसाठी अडीच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम आणि स्वयंरोजगाराची हमी मिळत असल्याने दरवर्षी आयटीआयसाठी उपलब्ध जागांच्या दुपटीने अर्ज येतात. यंदाही आयटीआयसाठी राज्यातून मोठ्या प्रमाणात अर्जनोंदणी झाली असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत ती कमी आहे. यंदा राज्यात आयटीआयसाठी सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत २ लाख ६१ हजार ६३२ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी ही संधी उपलब्ध राहणार असल्याची माहिती संचालक दिगंबर दळवी यांनी दिली.
यंदा राज्यात शासकीय आयटीआयमध्ये ९३ हजार तर खासगी आटीआयमध्ये ५५ हजार अशा एकूण १ लाख ४८ हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यंदा अमरावती विभागातून ४७ हजार १७८, औरंगाबाद विभागातून ५६ हजार १६६ , मुंबई विभागातून ३६ हजार ७४५, नागपूर विभागातून ३४ हजार ६५५, तर नाशिक विभागातून ४३ हजार ५९२ आणि पुणे विभागातून ४३ हजार २९६ अर्जांची नोंदणी झाली आहे.
मागील वर्षी आयटीआयसाठी ३ लाख ३२ हजार २१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा दहावीच्या निकालाचा टक्का वाढल्याने आयटीआयसाठी येणाऱ्या अर्जात ही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, विद्यार्थ्यांचा हवा तास प्रतिसाद न मिळाल्याने संचालनालयाकडून प्रवेश प्रोत्साहन अभियानही राबविण्यात आले.
दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे दहावीनंतर स्थलांतर, ढासळलेली आर्थिक परिस्थिती या सगळ्याचा परिणामही सगळ्याच अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियांवर होत असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
प्रवेश कुठे घ्यावा, या संभ्रमात
यंदा अकरावीसह सर्वच अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. दरम्यान आयटीआयसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी चांगली अर्जनोंदणी केली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. अकरावी प्रवेशाच्या अद्यापही २ गुणवत्ता याद्या बाकीच्या असल्याने अनेक विद्यार्थी नेमका कुठे प्रवेश घ्यावा, या संभ्रमात आहेत.
-------
विभाग - अर्ज नोंदणी - निश्चित आणि पूर्ण अर्ज
अमरावती - ४७१७८- ४६०७६
औरंगाबाद - ५६१६६- ५४६०९
मुंबई - ३६७४५- ३५८७७
नागपूर - ३४६५५- ३३८६९
नाशिक - ४३५९२- ४२६६९
पुणे - ४३२९६- ४२५१८
एकूण - २६१६३२- २५५६१८
--------------
मुंबई विभागातील अर्जनोंदणीची स्थिती
विभाग - अर्ज नोंदणी - निश्चित आणि पूर्ण अर्ज
मुंबई शहर - २९१४- २७८३
मुंबई उपनगर - ३६११- ३५०९
पालघर - ५६३२- ५५०१
रायगड - ७५२२- ७३८४
रत्नागिरी - ४२७६- ४२२५
सिंधुदुर्ग - २२३६- २२१२
ठाणे - १०५५४- १०२६३
एकूण - ३६७४५- ३५८७७