लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मागील चार दिवसात म्हणजे १६ ते १९ ऑगस्ट पर्यंत सर्व पम्पिंग स्टेशनमधून तब्बल १६,४५१.५५ दशलक्ष लिटर (१,६४५.१५५ कोटी लिटर) एवढया पाण्याचा उपसा करण्यात आला. एका अर्थाने ८,०४.६ कोटी लिटर एवढी जलधारण क्षमता असणा-या तुळशी तलावातील पाण्याच्या दुपटीपेक्षा अधिक पाण्याचा उपसा गेल्या ४ दिवसांत करण्यात आला आहे.
पाण्याचा निचरा प्रभावीपणे होण्यासाठी एकूण ६ पंपींग स्टेशन कार्यरत आहेत. या उदंचन केंद्रामध्ये एकूण ४३ पंप असून यापैकी प्रत्येक पंपाची क्षमता प्रति सेकंदाला ६,००० लिटर पाण्याचा उपसा करण्याची आहे. याचाच अर्थ सर्व पंपांची एकत्रित क्षमता ही प्रत्येक सेंकदाला २ लाख ५८ हजार लिटर एवढ्या पाण्याचा उपासा करण्याची आहे. पाण्याचा उपसा करण्यासाठी सर्व ६ उदंचन केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या पंप ४ दिवसांच्या कालावधी दरम्यान सर्व पंपांचा एकत्रितरित्या विचार केल्यास एकूण ७६१ तास व ३८ मिनिटे कार्यरत होते.,असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
५४० उदंचन पंपांद्वारे सहा तासात १८२.५ कोटी लिटर पाण्याचा उपसा पाणी उपसण्यासाठी महानगरपालिकेने ५४० उदंचन पंप बसवले आहेत. मंगळवारी ६ तासात या ५४० उदंचन पंपांद्वारे १८२.५ कोटी लिटर पाण्याचा उपसा करण्यात आला आहे.
पाण्याचा सर्वाधिक उपसा हा इर्ला उदंचन केंद्राद्वारे करण्यात आला. या केंद्राद्वारे ३,७६८.४८ दशलक्ष लिटर एवढया पाण्याचा उपसा करण्यात आला. या खालोखाल क्लिव्हलॅंड बंदर उदंचन केंद्रातून २,९०६.०२ दशलक्ष लिटर, गजधरबंध उदंचन केंद्रातून २,८७०.११ दशलक्ष लिटर, लवग्रोव्ह उदंचन केंद्रातून २,८२६.५० दशलक्ष लिटर,हाजी अली उदंचन केंद्रातून २,३७९.७८ दशलक्ष लिटर आणि ब्रिटानिया उदंचन केंद्रातून १७००.६७ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा करण्यात आला. यानुसार सर्व ६ उदंचन केंद्राद्वारे १६,४५१.५५ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा करण्यात आला.