Join us

पदव्युत्तर डॉक्टर जास्त; ‘बॉण्ड’च्या जागा कमी; मार्डची जागा वाढविण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 07:51 IST

उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना बंधपत्रित जागा मिळणार नाही. त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई :  राज्यात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत येणाऱ्या पदव्युत्तर वैद्यकीय शाखेतील सर्वसाधारण  १,७५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांना शासनाच्या किंवा महापालिकेच्या रुग्णालयात एक वर्षाची बंधपत्रित सेवा (बॉण्ड सर्व्हिस) देणे बंधनकारक आहे. मात्र, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने जाहीर केलेल्या बंधपत्रित जागा विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी म्हणजे १,६०० इतक्याच आहेत.

उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना बंधपत्रित जागा मिळणार नाही. त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संचालनालयाने बंधपत्रित जागा वाढवाव्यात, अशी मागणी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने केली आहे. शासनाच्या किंवा महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयातून पदव्युत्तर विषयात उत्तीर्ण झाल्यावर या सर्व डॉक्टरांना एक वर्ष त्याच रुग्णालयात सेवा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांना इतर कुठल्याही गोष्टी करता येत नाहीत. बंधपत्रित सेवेची जागा मिळण्याची वाट बघत बसणे हा एकमेव पर्याय त्यांच्यासमोर असतो. त्यामुळे जेवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तेवढ्या जागा संचालनालयाने वाढविण्याची अपेक्षा ‘मार्ड’ने व्यक्त केली आहे.

गेल्यावर्षीही असाच तिढा निर्माण झाला होता. त्यावेळी १,४३२ बंधपत्रित सेवा जागा वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्या पद्धतीचा शासन निर्णयसुद्धा जाहीर करण्यात आला होता. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या पदांकरिता आवश्यक असणारा निधी मंजूर करण्यात आला नसून मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत यावर निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे. महापालिका वैद्यकीय महाविद्यालय निवासी डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. वर्धमान रोठे यांनी सांगितले की, आम्ही आमचे म्हणणे संचालनालयाला कळविले आहे.

राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठातांकडून बंधपत्रित सेवेच्या किती जागा उपलब्ध आहे, यांची माहिती मागविण्यात आली होती. त्यानुसार जागा जाहीर केल्या आहेत. मात्र, मार्डचे पत्र मिळाल्यानंतर पुन्हा एकदा अधिष्ठातांकडून चुकून काही जागा कळविणे बाकी राहिले असतील तर त्या त्यांनी कळवाव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.- डॉ. अजय चंदनवाले, प्रभारी संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय

टॅग्स :डॉक्टर