Join us

बुलेट ट्रेनच्या १६ किमी बोगद्यासाठी ७६ हजारांहून अधिक सेगमेंट

By सचिन लुंगसे | Updated: May 21, 2024 18:43 IST

बोगदा बनविण्यासाठी विशेष रिंग सेगमेंट टाकण्यात येत आहेत.

मुंबई : मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर असून, या प्रकल्पातील १६ किलोमीटर बोगद्यासाठी ७६ हजारांहून अधिक सेगमेंट लागणार असल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून देण्यात आली. बुलेट ट्रेनसाठी वांद्रे-कुर्ला संकुल ते शिळफाटयादरम्यान २१ किलोमीटरचा बोगदा बांधण्यात येत आहे. एकूण लांबीपैकी १६ किलोमीटरचे खोदकाम तीन टनेल बोरिंग मशिनद्वारे केले जाणार आहे. तर उर्वरित ५ किलोमीटरचे खोदकाम न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड वापरून केले जाणार आहे.

टीबीएमसह १६ किलोमीटरचा हा भाग बांधण्यासाठी ७६ हजार ९४० सेगमेंट टाकून ७ हजार ४४१ रिंग तयार करण्यात येणार आहेत. बोगदा बनविण्यासाठी विशेष रिंग सेगमेंट टाकण्यात येत आहेत. प्रत्येक रिंगमध्ये नऊ वक्र विभाग आणि एक मुख्य विभाग आहे. प्रत्येक विभाग २ मीटर रुंद आणि ०.५ मीटर जाडीचा आहे. ठाणे जिल्ह्यातील महापे येथे ९८ हजार ८९८ चौरस मीटर क्षेत्रफळावर कास्टिंग अँड स्टॅकिंग यार्ड सुरू करण्यात येत आहे. कास्टिंग ऑपरेशन्स प्रमाणात स्वयंचलित आणि यंत्रसामग्रीकरणासाठी विविध क्रेन्स, गॅन्ट्रीज आणि मशीनने सुसज्जत आहेत.

टॅग्स :मुंबईमेट्रो