४० हजार उत्तर मुंबईकरांनी घेतला आयुष्मान भारत योजनेचा लाभ, पीयूष गोयल यांच्या प्रयत्नांना यश
By मनोहर कुंभेजकर | Updated: April 16, 2025 14:16 IST2025-04-16T14:16:43+5:302025-04-16T14:16:49+5:30
जगातील सर्वांत मोठी विमा योजना म्हणून आयुष्मान भारत योजनेला ओळखले जाते. देशातील ४० टक्के गरीब लोकांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांची यात तरतूद आहे.

४० हजार उत्तर मुंबईकरांनी घेतला आयुष्मान भारत योजनेचा लाभ, पीयूष गोयल यांच्या प्रयत्नांना यश
मुंबई – जगातील सर्वांत मोठी विमा योजना म्हणून आयुष्मान भारत योजनेला ओळखले जाते. देशातील ४० टक्के गरीब लोकांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांची यात तरतूद आहे. उत्तर मुंबईतआयुष्मान भारत योजनेचा ४० हजाराहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. तसेच उत्तर मुंबईतून योजनेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. आयुष्मान भारत योजनेचा लाभ सर्व गरीब जनतेपर्यंत पोहोचावा, यासाठी त्यांनी विशेष मोहिम हाती घेतली आहे.
उत्तर मुंबईमध्ये आयुष्मान भारत योजनेचा लाभ ४० हजाराहून अधिक नागरिकांनी घेतला असून दररोज नोंदणी देखील सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केल्यानंतर उत्तर मुंबईतील गरीब जनतेला या योजनेचा पुरेपूर फायदा मिळावा, यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतील उत्तर विभागात (उदा. दहिसर, बोरीवली, कांदिवली आणि मालाड) विविध सामाजिक-आर्थिक स्तरांतील लोक राहतात. या भागांमध्ये गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांची संख्या उल्लेखनीय आहे. त्यामुळे एकही गरीब माणूस हा उपचाराविना मृत्यूमुखी पडू नये. यासाठी आयुष्मान भारत योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि आपले आरोग्य जपावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केले.
कांदिवली पश्चिमेकडील एस.व्ही.रोड येथील लोककल्याण या त्यांच्या कार्यालयात सकाळी ९ ते सायं. ६.३० वाजेपर्यंत कधीही येऊन मोफत आयुष्मान भारत कार्ड तसेच इतर योजनांचे कार्ड बनवू शकता. आयुष्मान भारत योजनेच्या कार्डचा लाभ सगळ्यांना घ्यावा आणि गोरगरिबांचे प्राण वाचावे, यासाठी उत्तर मुंबई भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून दिले. ‘उत्तर मुंबईला, उत्तम मुंबई’ बनवायचे असेल तर नागरिकांचे आरोग्य चांगले असले पाहिजे असे मत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केले.
कोणती कागदपत्रे लागतात?
आयुष्मान भारत योजनेचे कार्ड काढण्यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड लागते. त्यासोबतच आधार कार्डशी मोबाइल लिंक करणे गरजेचे आहे.
१३५६ आजारांचा समावेश
आयुष्मान भारत योजनेतून १३५६ प्रकारच्या आजारांवर उपचार केले जातात. या उपचारासाठी लागणारे पैसे शासन देते. सर्व गंभीर आजारांवरील उपचार या योजनेतून करण्यात येतात.