राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
By दीपक भातुसे | Updated: October 6, 2025 05:26 IST2025-10-06T05:26:08+5:302025-10-06T05:26:16+5:30
केंद्र शासनाने जाहीर केलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्यात लागू झाले असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी प्राध्यापकांसह शिक्षकेत्तर कमचाऱ्यांची रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. मात्र रिक्त पदांमुळे या धोरणाच्या अंमलबजाणीत अडचणी येत असल्याचे चित्र आहे.

राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
- दीपक भातुसे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती होत असताना, दुसरीकडे राज्यात प्राध्यापकांच्या मात्र बारा हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. यात अनेक प्राध्यापक हे पीएचडी, तसेच नेट, सेट असूनही त्यांना पदापासून वंचित राहावे लागत आहे. तर, अनेक महाविद्यालयांत प्राध्यापक तासिका तत्त्वावर कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत.
राज्यातील ११ सार्वजनिक विद्यापीठे आणि १ हजार १७२ अनुदानित महाविद्यालयांमध्ये ३३ हजार ७६३ प्राध्यापकांची पदे मंजूर आहेत. त्यातील २१ हजार २३६ पदांवर प्राध्यापक कार्यरत असून, तब्बल १२ हजार ५२७ जागा रिक्त आहेत. मागील पाच वर्षांत राज्यात केवळ २ हजार ८८ पदांची भरती झालेली आहे.
विविध संघटनांची मागणी
केंद्र शासनाने जाहीर केलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्यात लागू झाले असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी प्राध्यापकांसह शिक्षकेत्तर कमचाऱ्यांची रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. मात्र रिक्त पदांमुळे या धोरणाच्या अंमलबजाणीत अडचणी येत असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे ४,३०० प्राध्यापकांची पदे भरण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताब उच्च शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे सादर केला. मात्र, त्यावर निर्णय झालेला नाही. राज्यात अनेक वर्षांपासून प्राध्यापकांची भरती रखडलेली आहे. प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे लवकरात भरावी, अशी मागणी विविध संघटनांच्या माध्यमातून करण्यात आली.
शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ७५% जागा भरण्याचे आदेश सर्व राज्यांना आहेत. त्यानुसार उच्चशिक्षण विभागाने ४,३०० प्राध्यापकांच्या भरतीसाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर केला. त्यावर निर्णय कधी होणार?
महेश घरबुडे, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन.
गेल्या अनेक वर्षांपासून भरती होत नाही. नेट, सेट, तसेच पीएच.डी. पात्रताधारक प्राध्यापकांना न्याय मिळावा, यूजीसीच्या नियमानुसार सर्व विद्यापीठ व महाविद्यालयात प्राध्यापकांची मंजूर पदांची भरती प्रक्रिया लवकर पार पडली पाहिजे. तासिका किंवा मानधनावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना आपल्या हक्काची नोकरी मिळावी.
प्रशांत शिरगूर, राज्य उपाध्यक्ष, पवित्र शिक्षक भरती संघटना.