Join us  

'डॉ. काशिनाथ घाणेकर'चे आणखी 4 शो लावणार, सिनेमॅक्सचं मनसेला लेखी आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 2:23 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून खळ्ळ खट्यॉकचा इशारा देण्यात आल्यानंतर मल्टिप्लेक्स चालकांचे धाबे दणाणल्याचं दिसतं आहे.

ठळक मुद्देमनसेच्या इशाऱ्यानंतर सिनेमॅक्सचं धाबे दणाणलेआणखी 4 शो दाखवण्याचे सिनेमॅक्सचं लेखी आश्वासनथिएटरची तोडफोड करण्याचा मनसेनं दिला इशारा

कल्याण - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून खळ्ळ खट्यॉकचा इशारा देण्यात आल्यानंतर मल्टिप्लेक्स चालकांचे धाबे दणाणल्याचं दिसतं आहे. मनसेनं दणका दिल्यानंतर सिनेमॅक्सकडून रविवारपासून (11नोव्हेंबर) आणखी चार शो दाखवण्यात येणार आहेत. याबाबतचं लेखी आश्वासन मनसेला देण्यात आले आहे. 

अभिजित देशपांडे दिग्दर्शित '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' सिनेमा सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मात्र, सिनेमाला प्राईम टाईम शो न दिल्यामुळे मनसे आक्रमक झाली होती. कल्याणमधील मल्टिप्लेक्स चालकांविरोधात मनसेआक्रमक झाली होती. शिवाय, सिनेमाचा दिवसभरात केवळ एकच शो होत असल्यानं प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर, सिनेमाला तात्काळ प्राईम टाईम म्हणजेच संध्याकाळच्या वेळेतील शो न दिल्यास मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा मल्टिप्लेक्सना देण्यात आला होता. डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमाला प्राईट टाईम द्या, अन्यथा पीव्हीआर व सिनेमॅक्समध्ये तोडफोड करू, असा इशारा कल्याण मनसे शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी दिला होता. मनसेच्या दणक्यानंतर मल्टिप्लेक्स चालकांचं धाबे दणाणले आणि त्यांनी काशिनाथ घाणेकर सिनेमाचे आणखी चार शो दाखवणार असल्याचे थेट लेखी आश्वासन दिले.  

('डॉ. काशिनाथ घाणेकर'वर अन्याय केल्यास खळ्ळ खट्याक; मल्टिप्लेक्स चालकांना अमेय खोपकरांचा अंतिम इशारा)

दुसरीकडे, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' सिनेमाला स्क्रिन्स न देणाऱ्या मल्टिप्लेक्स धारकांना चांगलेच धारेवर धरले होते. यासंदर्भात त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर मल्टिप्लेक्स चालकांना अंतिम इशारा दिला होता. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते की, सर्व मल्टिप्लेक्स थिएटर मालकांसाठी अंतिम इशारा! "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" या चित्रपटावर अन्याय केल्यास "खळ्ळ खटॅक" होणार. या महत्त्वाच्या मराठी चित्रपटाला अन्यायाने डावलून हिंदी चित्रपटांना प्राधान्य दिल्यास ते सहन केले जाणार नाही. येत्या चोवीस तासात "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर"ला स्क्रीन्स आणि शोज द्या अन्यथा आम्हाला मनसे स्टाईलने धडा शिकवावा लागेल.' 

'...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'ला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद

मराठी रंगभूमीवरील पहिले सुपरस्टार अभिनेते काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा 8 नोव्हेंबरला रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. सर्वत्र सिनेमाचे कौतुक केले जात आहे. कल्याणमध्ये बहुंताश परिसर हा मराठी भाषिक आहे, मात्र सिनेमॅक्समध्ये या सिनेमाचा केवळ दुपारी तीन वाजताच शो लावण्यात आला होता. यामुळे सिनेरसिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.  दुसरीकडे, अमिताभ बच्चन- आमिर खान यांच्या 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' सिनेमाचे दिवसभरात तब्बल 8 शो सुरू आहेत. सिनेमामध्ये मोठी स्टारकास्ट आहे, मात्र कथेमुळे प्रेक्षकांची निराशा झाल्यानं ठग्ज ऑफ हिंदोस्तानकडे पाठ फिरवली गेली आहे. एकूणच हा सिनेमा बॉक्सऑफिसवर आपली जादू पसरवण्यात कमी पडला आहे. या तुलनेत काशीनाथ घाणेकर सिनेमांला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले आहे. पण थिएटरमध्ये सिनेमाला प्राईम टाईमच देण्यात आलेला नाही. याविरोधातच मनसे आक्रमक झाली होती. या पार्श्वभूमीवर, सिनेमांना आज प्राईम टाईम न मिळाल्यास मल्टिप्लेक्स फोडण्याचा इशारा कौस्तुभ देसाई यांनी दिला होता. यासाठी मल्टिप्लेक्स चालकांना दुपारपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला होता.

टॅग्स :आणि डॉ. काशिनाथ घाणेकरकाशिनाथ घाणेकरसुबोध भावे मनसे