Join us  

Mumbai News: व्हॉटसअपवर मिळणार बीएमसीच्या ८० पेक्षा अधिक सेवा; चॅट बॉट आला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 2:15 PM

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या विविध ८० पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर ८९९९-२२-८९९९ या व्हॉट्सअप क्रमांकाद्वारे अत्यंत सहजपणे उपलब्ध होणार आहे. 

 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण आज शुक्रवार, दिनांक १४ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मकर संक्रांतीच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. शासकीय, प्रशासकीय कारभाराबद्दल बोलताना तिळगुळ दिल्याशिवाय  काम होत नाही असा गैरसमज आहे. परंतू त्याला छेद देणारा आजचा उपक्रम असल्याचे ठाकरे म्हणाले. मत मागतांना वाकणारी, झुकलेली माणसं मत मिळाल्यानंतर ताठ होतात पण ज्यांना लोकांसाठी काम करायचे असते ती नेहमीच विनम्र असतात. आपली मुंबई, माझी मुंबई ही देशातील एक नंबरची महापालिका जिने जनतेला ८० हून अधिक सुविधा घरबसल्या दिल्या. वर्क फ्रॉम होमची सुविधा या उपक्रमाने अधिक सक्षम केल्याचे ते म्हणाले. 

महापालिका रोज काय काम करते, रोज गटार साफ करते, कचरा उचलते, रोज पाणी देते, धरणे बांधणे असेल ही सगळी कामे महापालिका कसे करते, घाणीत उतरून सफाई कामगार आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत असतो या सगळ्याची माहिती नागरिकांना द्यावी. कोविड काळात महापालिकेचे काम कौतूकास्पद आहे. स्वत: काही करायचं नाही पण महापालिका काय करते हा प्रश्न काहीजण नेहमी उपस्थित करतात, असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला. 

इज ऑफ लिविंगमध्ये मुंबई जगात सर्वात पुढे राहील असा विश्वास देतो. महाराष्ट्रासाठी, समाजासाठी खुप काही चांगलं करण्याचा प्रयत्न आज होत आहे. कोविड चॅटबॉट आपण महापालिकेत सुरु केले. जगात अशी एक दोनच राज्ये, त्यात आपलाही समावेश आहे, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. पाणी पट्टी, घरपट्टी, वीज बिल भरणे असेल, महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा असेल अशा अनेक ८० हून अधिक सुविधा नागरिकांना या व्हॉटसअप चॅट बॉट द्वारे देण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाउद्धव ठाकरे