राज्यात आयटीआयच्या ४० हजारांहून अधिक जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:26 IST2021-02-05T04:26:57+5:302021-02-05T04:26:57+5:30

मागील वर्षीपेक्षा प्रवेशांत १० टक्क्यांनी घट : सरकारी आयटीआय प्रवेशाकडे कल लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील आयटीआय प्रवेशाची ...

More than 40,000 vacancies for ITIs in the state | राज्यात आयटीआयच्या ४० हजारांहून अधिक जागा रिक्त

राज्यात आयटीआयच्या ४० हजारांहून अधिक जागा रिक्त

मागील वर्षीपेक्षा प्रवेशांत १० टक्क्यांनी घट : सरकारी आयटीआय प्रवेशाकडे कल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया संपली असून यंदा ४४ हजार जागा रिक्त राहिल्या. मागील वर्षीपेक्षा हे प्रमाण १० टक्क्यांनी वाढले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा रिक्त जागांचे प्रमाण वाढल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली. मागील वर्षी एकूण प्रवेशांपैकी आयटीआयमध्ये प्रवेशाचे प्रमाण ७९ टक्के होते. यंदा केवळ ६९ टक्के प्रवेश निश्चित होऊ शकले.

यंदा झालेल्या एकूण प्रवेशांमध्ये सरकारी आयटीआयमध्ये झालेले प्रवेश हे ८१ टक्के इतके, तर खासगी आयटीआयमध्ये झालेल्या प्रवेशाचे प्रमाण ४९ टक्के असल्याचे दिसून आले. त्यामुळे खासगी आयटीआयपेक्षा विद्यार्थी सरकारी आयटीआयलाच प्राधान्य देत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. यंदा आयटीआयच्या प्रवेशासाठी एकूण १ लाख ४७ हजार ८१२ जागा राज्यात उपलब्ध होत्या. प्रवेश प्रक्रियेअंती त्यापैकी १ लाख ३ हजार २९१ जागांवर प्रवेश निश्चिती झाली. मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे.

मागीलवर्षी प्रवेशासाठी १ लाख ४८ हजार २५२ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी १ लाख १८ हजार २३२ जागांवर प्रवेश निश्चित झाले होते. यंदा पहिल्या कॅप राउंडमध्ये तब्बल ८८ हजार ६० विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आली. मात्र, त्यावेळी केवळ २६ हजार ८८१ विद्यार्थ्यांनी म्हणजेच केवळ ३० टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चिती केली. त्यानंतर मराठा आरक्षणाला देण्यात आलेल्या स्थगितीमुळे आयटीआय प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली आणि ५ डिसेंबर ते ८ डिसेंबरदरम्यान मराठा आरक्षण जागा वगळून दुसरा कॅप राउंड पार पडला. मात्र, त्यातही अनेक विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

* काेराेनामुळे वेळेत प्रवेश घेणे अशक्य!

दुसऱ्या कॅप राउंडमध्ये केवळ १८.८० टक्के, तर तिसऱ्या कॅप राउंडमध्ये २०.८९ टक्के प्रवेश विद्यार्थ्यांनी निश्चित केले. चौथ्या कॅप राउंडला २४.२१ टक्के प्रवेश निश्चित होऊ शकले. कोरोनाच्या लॉकडाऊनचा परिणाम झाल्यामुळे अनेक विद्यार्थी वेळेवर प्रवेश न घेऊ शकल्यानेही प्रवेशांवर परिणाम झाला असल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली.

वर्ष - एकूण जागा - एकूण प्रवेश - एकूण प्रवेश (टक्क्यांमध्ये)- शासकीय (टक्क्यांमध्ये) - खासगी (टक्क्यांमध्ये)

२०१९- १,४८,२५६- १,१८,२३४-७९. ७५%- ८९. १४ - ६३. ८४

२०२०- १,४७,८१२- १,०३,२९१-६९. ८८ %- ८१. ९७- ४९. ४७

Web Title: More than 40,000 vacancies for ITIs in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.