Join us  

CoronaVirus News: मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी १ हजाराहून अधिक रुग्ण; तर तीन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 1:34 AM

कोरोनाचा प्रसार मुंबईत पुन्हा झपाट्याने वाढू लागला आहे.

मुंबई : कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच असून, सलग तिसऱ्या दिवशी मुंबईत एक हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. शुक्रवारी १०३४ बाधित रुग्णांची नोंद झाली, तर तीन जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णवाढीचे दैनंदिन सरासरी प्रमाण ०.२७ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर सक्रिय रुग्णांचा आकडाही आता ९३१५ एवढा झाला आहे.

कोरोनाचा प्रसार मुंबईत पुन्हा झपाट्याने वाढू लागला आहे. दोन आठवड्यांपूर्वी रुग्णांची संख्या तीनशे वरून सातशेवर पोहोचली, तर बुधवारपासून त्यात आणखी वाढ होऊन सलग दोन दिवस ११६७ आणि ११४५ बाधित रुग्णांची नोंद झाली. यात थोडी घट झाली तरी शुक्रवारी बाधित रुग्णांची संख्या एक हजारांहून अधिक आहे. त्यामुळे रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता २५६ दिवसांवर आला आहे.

रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्यूच्या आकडा कमी राखण्यात पालिकेला यश आले आहे. शुक्रवारी ७१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन पुरुष आणि एका महिला रुग्णाचा समावेश आहे. यापैकी तिघांनाही दीर्घकालीन आजार होते, तर तिन्ही रुग्ण ६० वर्षांवरील आहेत. आतापर्यंत ११ हजार ४६१ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत ३२ लाख ३० हजार ७९८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई