म.रे.ला मिळणार १00 जादा फेऱ्या
By Admin | Updated: November 27, 2015 02:40 IST2015-11-27T02:40:17+5:302015-11-27T02:40:17+5:30
मध्य रेल्वे मार्गावरील सीएसटी ते कल्याण असा संपूर्ण पाचवा-सहावा मार्ग पूर्ण झाला नसून त्यामुळे लोकल फेऱ्यांतही अडथळा येत आहेत

म.रे.ला मिळणार १00 जादा फेऱ्या
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील सीएसटी ते कल्याण असा संपूर्ण पाचवा-सहावा मार्ग पूर्ण झाला नसून त्यामुळे लोकल फेऱ्यांतही अडथळा येत आहेत. हा मार्ग पूर्ण झाल्यास मध्य रेल्वेला १00 जादा लोकल फेऱ्या मिळणे शक्य होईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगितले. सध्या ठाणे ते दिवा पाचव्या-सहाव्या मार्गावरील काम सुरू असून सीएसटी ते कुर्लापर्यंतच्या कामास अजूनही सुरुवात झालेली नाही.
एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) एमयूटीपी-२ अंतर्गत सीएसटी ते कल्याण अशा पाचव्या-सहाव्या मार्गाचे काम टप्प्याटप्यात केले जात आहे. सध्या ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गाचे काम पूर्ण करण्यावर भर दिला जात असून डिसेंबर २0१७ पर्यंत हे काम पूर्ण केले जाईल, असा दावा रेल्वे अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. तर सीएसटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग पूर्ण करण्यात अनेक अडचणींचा सामना रेल्वेला करावा लागत आहे. रुळांजवळ अनधिकृत बांधकामे असल्याने हे काम अद्यापही सुरू करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. पाचव्या-सहाव्या मार्गातील फक्त दिवा ते कल्याण आणि कुर्ला ते ठाणे दरम्यानचे काम पूर्ण करण्यात आले आहे. जर सीएसटी ते कल्याणपर्यंत संपूर्ण पाचव्या-सहाव्या मार्गावरील काम पूर्ण होऊन हा मार्ग मिळाल्यास १00 जादा लोकल फेऱ्याही मध्य रेल्वेला मिळतील, असे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. संपूर्ण पाचवा-सहावा मार्ग मिळत नसल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गावरून वळविण्यात येत आहेत. त्यामुळे जलद जादा लोकल सध्या प्रवाशांना मिळत नसल्याचे सांगितले. तर याचा तांत्रिकदृष्ट्या धिम्या लोकल सेवेवरही परिणाम होत असून त्यामुळे या लोकलच्या फेऱ्याही वाढविणे अशक्य होत आहे. एकूणच पाचवा-सहावा मार्ग पूर्ण झाल्यास १00 जादा लोकल फेऱ्या टप्प्याटप्प्यात मेन लाइनवर वाढविणे सहज शक्य होईल, अशी माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)