Join us  

Monsoon2018 डॉगी आणि बाईकसाठी सुद्धा बाजारात फॅशनेबल छत्र्या, तुम्ही पाहिल्या का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 11:49 AM

नेमकं काय खरेदी करावं हा प्रश्न तुम्हाला पडून तुमचा गोंधळ उडू शकतो, त्यामुळे तुमची थोडी मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.

ठळक मुद्दे एव्हाना वेगवेगळ्या वस्तूंनी  बाजारपेठाही सज्ज झाल्या आहेत. पावसाळ्यासाठी आवश्यक वस्तू बाजारपेठांमध्ये आल्याने तुम्ही मंडळी आता घराबाहेर पडून शॉपिंग करू शकता. रंगीबेरंगी छत्र्या, रेनकोट आणि इतर गोष्टी पाहून नेमकं काय खरेदी करावं हा प्रश्न तुम्हाला पडून तुमचा गोंधळ उडू शकतो.

मुंबई : पावसाळामुंबईत आलाय खरा पण अजून त्याने बरसण्यात सातत्य काही ठेवलं नाहीये. भरपूर पाऊस सुरू झाल्यानंतर छत्री विकत घेऊ असा विचार तुम्ही करत असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. एव्हाना वेगवेगळ्या वस्तूंनी  बाजारपेठाही सज्ज झाल्या आहेत. पावसाळ्यासाठी आवश्यक वस्तू बाजारपेठांमध्ये आल्याने तुम्ही मंडळी आता घराबाहेर पडून शॉपिंग करू शकता.

जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या रंगीबेरंगी छत्र्या, रेनकोट, बॅग, शूज आणि इतर गोष्टी पाहून नेमकं काय खरेदी करावं हा प्रश्न तुम्हाला पडून तुमचा गोंधळ उडू शकतो, त्यामुळे तुमची थोडी मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.

1) पावसाळी चपला

आज बाजारात अनेक प्रकारच्या पावसाळी चपला, शूज उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी, स्त्रियांसाठी आणि पुरूषांसाठीच्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सॅंडलनी दुकाने, मॉल आणि ऑनलाईन शॉपिंग साईट्स ओसंडून वाहत आहेत. लहान मुलांना त्यांच्या आवडीच्या कार्टूनची प्रिंट असलेली रेनी शूज आणि रेनी फुटवेअर उपलब्ध आहेत तर स्त्रियांना विविध पॅटर्न आणि रंगांसह भरपूर सँडल उपलब्ध आहेत. 

त्यातही पेस्टल कलर्सच्या सॅँडलला प्राधान्य दिसतोय. इतकंच नव्हे तर त्यांना सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या गडद रंगातील सँडलचाही पर्याय उपलब्ध आहे. त्यातही वेगवेगळ्या स्टाईलप्रमाणे आणि कॉलिटीप्रमाणे अगदी १५० पासून ७०० रुपयांपर्यंतच्या रेनी सँडल महिला या पावसाळ्यात वापरू शकतात.

 पुरूषांसाठीसुद्धा गमबूट आणि वेगवेगळ्या प्रकारचे रेनी शूज बाजारात उबलब्ध आहेत. ऑफिसला रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या पण फॉर्मल्ससारख्या दिसणाऱ्या या शूजची मोठी रेंज बाजारात उपलब्ध आहे.

2) गाडींच्या छत्री

दुचाकी गाडीवर असताना पाऊस आल्यास छत्री उघडण्याचा पर्यायच आपल्याला उपलब्ध नसतो. मग आपण आणि आपल्यासह आपली गाडी भिजते. ती गरज हेरून या नव्या गोष्टीचा शोध लावण्यात आला असावा.

आजकाल दुचाकी गाड्यांनासुद्धा छप्पर लावल्याचे तुम्ही आसपास पाहिलं असेल. हे कव्हर असं असतं की, पाऊस पडत असला तरी तुमच्यासहीत तुमची गाडीसुद्धा झाकली जाते आणि न भिजता प्रवास होतो.

३) रेनकोट

छत्र्यांइतकंच रेनकोटला प्राधान्य देणारा एक वेगळा वर्ग अस्तित्वात आहे. काहींना ते दिवसभर सांभाळणं कंटाळवाणं आणि ओझ्यासारखं वाटतं. तर काहींसाठी रेनकोट ‘परफेक्ट’ असतो.

लहान मुलांना वेगवेगळ्या कार्टून्सची प्रिंट असलेले किंवा इतर रंगीबेरंगी रेनकोट उपलब्ध आहेत.  सरळ वनपीस किंवा टॉप आणि बॉटमचे दोन भाग वेगवेगळे असलेले रेनकोट बाजारात मिळतात.

इतकंच नव्हे तर आता तर काहींच्या मागणीप्रमाणे पाळीव प्राण्यांसाठीसुद्धा रेनकोट बाजारात उपलब्ध होऊ लागले आहेत. आणि तसेच आपल्या पाठीवर असणाऱ्या सॅक बॅगसाठीसुद्धा आता कव्हर बाजारात उपलब्ध आहेत.

४) थ्री फोल्डच्या आणि लांब दांड्याच्या छत्र्या

पूर्वी बाजारात त्याच त्या जुनाट आणि मळकट रंगांच्या छत्र्या आपल्याला पाहायला मिळायच्या. मात्र हल्ली सगळ्याच क्षेत्रात फॅशन आणि ट्रेंडस ने एंट्री घेतली आहे. त्यामुळे आपल्या रोजच्या वापराला सोईस्कर आणि आपल्या लुक आणि फॅशनला सुटेबल छत्र्या घेण्याचा विचार सर्वांकडून केला जातो.

कॉलेजला जाणाऱ्या मुली लांब दांड्याच्या (जशा पूर्वी आजोबांच्या हातात दिसायच्या तशा) छत्र्यांना पसंती देतात. तसेच तरूणींना फ्रिलवाल्या अर्थात झालर असलेल्या छत्र्या फॅशनेबल वाटतात. तसंच वर्कींग वुमन तीन घड्यांवाली अर्थात थ्री फोल्डवाली छत्री विकत घेतात. कारण तिच्या लहानशा बॅगेत ती सामावली जाते.

यापुढे जाऊन सांगायचं तर कॉलेजची फॅशन दिवा समजली जाणारी मुलगी ट्रान्सपरंट छत्री अथवा रेनकोटला प्राधान्य देते, त्यातून ती आपण इतरांपेक्षा वेगळे असल्याचं इतरांना दाखवून देते. 

इतकंच नव्हे तर हल्ली मोबाईल, लॅपटॉप किंवा आपलं रोजचं सामान भिजू नये, अशा काही बॅग बा़जारात उपलब्ध आहेत.

त्यात मोबाईल, बस-ट्रेन पास किंवा आपली बँकांची कार्ड सांभाळून ठेवता येतात.

टॅग्स :मान्सून 2018मुंबईपाऊस