मान्सून चार दिवसांत अंदमानात दाखल होणार
By Admin | Updated: May 15, 2015 00:43 IST2015-05-15T00:43:09+5:302015-05-15T00:43:09+5:30
येत्या तीन ते चार दिवसांत नैऋत्य मौसमी पाऊस अंदमान निकोबार द्वीपसमूह आणि लगतच्या समुद्रावर दाखल होईल, असा अंदाज भारतीय

मान्सून चार दिवसांत अंदमानात दाखल होणार
मुंबई : येत्या तीन ते चार दिवसांत नैऋत्य मौसमी पाऊस अंदमान निकोबार द्वीपसमूह आणि लगतच्या समुद्रावर दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. तर त्यानंतर ३० मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होईल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.
अंदमान, निकोबारमार्गे मान्सून भारतात दाखल होतो. सर्वसाधारणपणे २० मे रोजी मान्सून अंदमानमध्ये दाखल होतो. त्यानंतर १ जूनपर्यंत तो केरळात दाखल होतो. यंदा तो १८ मे रोजी अंदमानात दाखल होईल, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. विशेषत: मागील काही दिवसांपासून अंदमान आणि बंगालच्या उपसागरात पावसाचे प्रमाण अधिक आहे. आणि हे वातावरण मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल आहे.
गेल्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्र, कोकण-गोवा, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला आहे. कोकणच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात
कमाल तापमानात सरासरीच्या
तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. पुढील ७२ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)