मान्सून : ब्रेकनंतर आनंद सरी, मात्र मुंबईकरांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:12 IST2021-09-02T04:12:35+5:302021-09-02T04:12:35+5:30

मुंबई : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यासह मुंबईत पावसाने मंगळवारी अक्षरश: धुमाकूळ घातला. मोठ्या ब्रेकनंतर मान्सून परतल्याने आनंद ...

Monsoon: Happy showers after the break, but a torrent of Mumbaikars | मान्सून : ब्रेकनंतर आनंद सरी, मात्र मुंबईकरांची तारांबळ

मान्सून : ब्रेकनंतर आनंद सरी, मात्र मुंबईकरांची तारांबळ

मुंबई : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यासह मुंबईत पावसाने मंगळवारी अक्षरश: धुमाकूळ घातला. मोठ्या ब्रेकनंतर मान्सून परतल्याने आनंद सरींनी नागरिकांना दिलासा दिला असला तरीदेखील पहिल्याच फटक्यात पावसाने मुंबईकरांना गारद केले. विशेषत: शहराच्या तुलनेत पूर्व आणि पश्चिम उपनगरात पहाटेपासून दुपारपर्यंत कोसळलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली होती.

मंगळवारी पहाटेपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. पहाटे कोसळलेल्या पावसाने सकाळी दहाच्या सुमारास जोर किंचित कमी केला. मात्र, साडेदहा ते अकरादरम्यान पावसाने जोर पकडला. साडेअकरा वाजता जोर कमी केलेल्या पावसाने बारा ते साडेबारादरम्यान मुंबईवर विशेषत: उपनगरात काळोख केला. मुसळधार पावसाच्या काळ्याकुट्ट ढगांनी मुंबईवर गर्दी केली आणि पुन्हा पावसाने जोर पकडला. विशेषत: दुपारी बारा ते साडेबारादरम्यान उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावली.

मंगळवारी सकाळी ८ वाजता गेल्या २४ तासांतील पावसाच्या नोंदीनुसार, शहरात ४२, पूर्व उपनगरात ३३ आणि पश्चिम उपनगरात ३९ मिलिमीटर एवढा पाऊस नोंदविण्यात आला. त्यानंतर मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत शहरात २०, पूर्व उपनगरात ४० आणि पश्चिम उपनगरात ३९ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. म्हणजे शहराच्या तुलनेत पूर्व आणि पश्चिम उपनगरात अधिक पाऊस नोंदविण्यात आला.

विविध ठिकाणी दरड आणि पडझडीच्या घटना

मुंबईत पावसाची दमदार बरसात होत असतानाच पडझडीच्या घटना घडतच होत्या. मंगळवारी सकाळी मालाड येथे आंबेडकरनगर परिसरात दगड कोसळल्याने १०० रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. तर सोमवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास कुर्ला येथील साकीनाका परिसरातील भानुशाली हॉल येथे दरडीचा भाग कोसळला. या दुर्घटनेत एक जण किरकोळ जखमी झाला. जिवश्च शाह असे या जखमीचे नाव असून, घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करून त्याला सोडून देण्यात आले. तर मुंबईत चार ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. तीन ठिकाणी झाडे कोसळली.

Web Title: Monsoon: Happy showers after the break, but a torrent of Mumbaikars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.