Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुलांची कामे पूर्ण होण्यास २०२१ चा पावसाळा उजाडणार; ३१४ पैकी २९६ पुलांचे ऑडिट केलं होतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 04:16 IST

१०६ पुलांची लहान दुरुस्ती, तर ८७ पुलांची मोठी दुरुस्ती

मुंबई : मुंबईला  ‘हादसो का शहर’ असे म्हटले जाते. येथे सतत काहीना काही दुर्घटना घडत असतात. अशा दुर्घटनांत नागरिकांचे नाहक बळी जातात. फोर्ट येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर खडबडून जाग्या झालेल्या मुंबई महापालिकेने ३१४ पैकी २९६ पुलांचे ऑडिट केले असून, यात २९ पूल अतिधोकादायक आढळले.  पायाभूत सेवासुविधांचा विकास वेगाने करण्यासाठी पालिका १०६ पुलांची लहान दुरुस्ती, तर ८७ पुलांची मोठी दुरुस्ती करणार आहे. यापैकी बहुतांश कामे सुरू झाली असून, पावसाळ्यापूर्वी पुलांची कामे पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.

हिमालय पूल पडल्यानंतर ३१४ पुलांपैकी २९६ पुलांचे नव्याने ऑडिट करण्यात आले. यात २९ पूल अतिधोकादायक आढळले. तर १०६ पुलांची लहान दुरुस्ती तर ८७ पुलांची मोठी दुरुस्ती होईल. ८७ पैकी ४८ पुलांचे काम हाती घेण्यात आले आहे. १४ कामे पूर्ण झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. आजघडीला हँकॉक, कर्नाक, महालक्ष्मी रेल्वे स्थानक, माहीम कॉजवे, नीलकंठ, मानखुर्द, विद्याविहार, बर्वेनगर, रेनेसान्स, हरितनाला, वीर संभाजीनगर मुलुंड, घाटकोपर येथील लक्ष्मीबाग, जोगेश्वरी रतननगर, कोरो केंद्र, मृणालताई गोरे पूल, गोखले पूल, धोबीघाट, पिरामल नाला आणि मेघवाडी येथे पुलांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहेत.

८ कोटी ८४ लाखांहून अधिक खर्चात वाढ

हिमालय पूल कोसळल्यानंतर महापालिकेने पुलांचा आढावा घेतला. आता दुरुस्तीसाठीच्या आठ पुलांमध्ये महालक्ष्मी रेल्वे पूल, सायन रेल्वे स्थानक पूल, टिळक पुलाकडील फ्लाय ओव्हर, दादर फुलबाजाराकडील पुलाचा समावेश आहे. 

माहीम फाटक पूल, करी रोड रेल्वे स्थानक पूल, सायन रुग्णालय येथील पूल आणि दादर धारावी नाल्यावरील पादचारी पुलाचाही समावेश आहे. या दुरुस्तीसाठी अधिकच्या ८ कोटी ४६ लाख रुपयांस मंजुरी मिळाली. हिमालय पुलाची दुर्घटना झाली तेव्हा या आठ पुलांच्या दुरुस्तीसाठी १५ कोटी ३३ लाख खर्च होणार होता. मात्र आता हा खर्च २३ कोटी ६० लाख झाला. म्हणजे यात ८ कोटी ८४ लाखांहून अधिक वाढ झाली आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका