मुंबई - नादुरुस्तीचे ग्रहण लागलेल्या मोनो रेल मार्गावर सोमवारी पुन्हा एकदा गाडी काही काळ थांबली. आचार्य अत्रेनगर स्थानकात गाडीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी चढल्याने स्थानकावर प्रवाशांना उतरविण्याची नामुष्की महामुंबई मेट्रो रेल संचलन मंडळावर (एमएमओसीएल) ओढवली. प्रवाशांचा भार कमी करून मग ही गाडी रवाना झाली. परिणामी मोनोचे वेळापत्रक कोलमडले.
मोनो मार्गिकेवर अतिरिक्त प्रवासी संख्येमुळे गेल्या आठवड्यात मंगळवारी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गाडीत १०४ टनांपेक्षा अधिक वजन झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय ‘एमएमओसीएल’ने घेतला आहे. सोमवारी अधिक प्रवासी गाडीत चढल्यामुळे तिचे वजन १०६ टनांवर गेले. परिणामी प्रवाशांना गाडीतून उतरविण्याचा निर्णय ‘एमएमओसीएल’ने घेतला. प्रवासी उतरण्यास विलंब लावत होते. त्यामुळे ही गाडी आचार्य अत्रेनगर स्थानकात १५ मिनिटे थांबली होती. त्यामुळे वेळापत्रक बिघडले असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.