मोनो @ स्लो ट्रॅक!

By Admin | Updated: February 3, 2015 00:25 IST2015-02-03T00:25:07+5:302015-02-03T00:25:07+5:30

मुंबईकरांच्या सेवेत २ फेब्रुवारी २०१४ रोजी दाखल झालेली मोनोरेल अजूनही स्लो ट्रॅकवरच आहे. मोनोरेलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढ होईल,

Mono @ Slow Track! | मोनो @ स्लो ट्रॅक!

मोनो @ स्लो ट्रॅक!

मुंबई : मुंबईकरांच्या सेवेत २ फेब्रुवारी २०१४ रोजी दाखल झालेली मोनोरेल अजूनही स्लो ट्रॅकवरच आहे. मोनोरेलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढ होईल, अशी अपेक्षा एमएमआरडीएला होती. परंतु प्रवाशांनी दिलेल्या थंड प्रतिसादामुळे ती फोल ठरली असून, मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्याचे कामदेखील धिम्या गतीने सुरू आहे. परिणामी मोनोचा दुसरा टप्पादेखील मुंबईकरांच्या सेवेत डिसेंबरच्या उत्तरार्धातच दाखल होईल.
मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि वेगवान व्हावा, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो आणि मोनो मुंबईकरांच्या सेवेत दाखल केल्या. चेंबूर-वडाळा-जेकब सर्कल या मार्गावरील चेंबूर ते वडाळा दरम्यान २ फेब्रुवारी २०१४ रोजी मोनो प्रवाशांसह धावू लागली आणि वडाळा ते जेकब सर्कल मार्गाचे काम अद्यापही सुरू आहे. मोनो मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर अधिकाधिक प्रवासी या सेवेचा लाभ घेतील, असा आशावाद प्राधिकरणाला होता.
चेंबूर ते वडाळा हा फार रहदारीचा रस्ता नसल्याने मोनोकडे फारसे प्रवासी फिरकले नाहीत. मुळात मोनोरेलने दिवसागणिक १५ ते १६ हजार प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज प्राधिकरणाने वर्तविला होता. परंतु, येथे फारशी वस्ती नसल्याने मोनोला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मोनोच्या सेवेसाठी दिवसागणिक ७ लाख खर्च होत आहेत आणि मोनोच्या महसुलातून प्राधिकरणाला दिवसाला दीड लाख मिळत आहेत. परिणामी प्राधिकरणाचा दिवसाला साडेपाच लाखांचा तोटा होत आहे. (प्रतिनिधी)

मोनोच्या दुसऱ्या टप्प्याचे काम आता सुरू आहे. हा टप्पा डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. नव्या वर्षात दुसरा टप्पादेखील मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल, असा दावा एमएमआरडीएने केला आहे. दुसऱ्या टप्प्यादरम्यान मोठी वस्ती आहे. प्राधिकरणाने हा दावा केला असला तरी प्रत्यक्षात मात्र दुसऱ्या टप्प्याची सेवा सुरू होण्यासाठी वर्षाचा कालावधी लागणार असल्याने मोनो स्लो ट्रॅकवरच असल्याचे चित्र स्पष्ट आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मोनोरेलचा घाट घालण्याची गरजच नव्हती. कारण मोनोरेल छोटी असून, तिची प्रवासी क्षमताच मुळात कमी आहे. आणि दुप्पट क्षमता पाहिजे असेल तर दुप्पट खर्च करणे अपेक्षित आहे. म्हणून आता ज्या तुलनेत खर्च होतो आहे त्या तुलनेत नफा होत नाही. शिवाय आता मोनोरेलमध्ये तांत्रिक समस्याही निर्माण होत असून, त्याऐवजी सरकारने बस रॅपिड ट्रान्सिट सिस्टम (बीआरटीएस)वर भर देणे गरजेचे आहे.
- सुधीर बदामी (वाहतूकतज्ज्ञ)

Web Title: Mono @ Slow Track!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.