गलथान कारभारामुळे मोनो-२ प्रकल्प रखडला
By Admin | Updated: April 14, 2015 02:13 IST2015-04-14T02:13:43+5:302015-04-14T02:13:43+5:30
वाहतूक सुसह्य होण्यासाठी वडाळा ते जेकब सर्कल या मोनो-२च्या प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले. मात्र या प्रकल्पाच्या विलंबास त्याच्या पूर्वीच्या मार्गातील बदल कारणीभूत ठरला आहे

गलथान कारभारामुळे मोनो-२ प्रकल्प रखडला
मुंबई : वाहतूक सुसह्य होण्यासाठी वडाळा ते जेकब सर्कल या मोनो-२च्या प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले. मात्र या प्रकल्पाच्या विलंबास त्याच्या पूर्वीच्या मार्गातील बदल कारणीभूत ठरला आहे. मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुख्यमंत्री व नगरविकास विभागाची संमती न घेता नियोजित रेषा मार्ग सुमारे अर्धा किलोमीटरने वाढविण्यात आला. त्याचे काम रेंगाळल्याने प्रकल्प लांबणीवर पडत असल्याचे माहिती अधिकार कायद्यातून पुढे आली आहे.
मोनो-२च्या पहिल्या प्रस्तावात जी.डी. आंबेकर मार्ग येथील गोरा कुंभार चौक ते माने मास्तर चौकपर्यंतच्या रेषेचा मार्ग होता. त्याऐवजी आचार्य धोंडे आणि ई बोजेस मार्ग असा नवीन मार्ग बनविण्यात आला. त्यामुळे अतिरिक्त ३८३ मीटर लांबी वाढविण्यात आली. पूर्वी जो रेषा मार्ग ०.७१७ मीटर होता तो आता १.१ इतका झाल्याची माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना प्राधिकरणाने दिली आहे. नवीन रेषा मार्ग बदलण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री किंवा नगर विकास विभागाला न कळविता तत्कालीन महानगर आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या उचित अधिकारात राहून करण्यात आला, त्यासाठी त्यांनी २४ सप्टेंबर २००९मध्ये जागेची पाहणी केली; आणि १९ नोव्हेंबरला तो प्रस्ताव कार्यान्वित करण्याचे पत्र मोनो रेल्वेचे संचालक विष्णू कुमार यांनी जारी केले असल्याचे त्यात नमूद केले आहे. या प्रकारामुळे प्रकल्प रेंगाळला आहे.