पालिकेच्या पर्यवेक्षकांकडून कचरा टाकणाऱ्यांवर नजर; दादरमधील दुकानदारावर कारवाई

By सीमा महांगडे | Published: December 26, 2023 11:32 PM2023-12-26T23:32:59+5:302023-12-26T23:33:26+5:30

पालिकेचे सफाई कर्मचारी सकाळी सातपूर्वी रस्त्यावरील कचरा गोळा करून स्वच्छता करतात.

monitoring of litterers by municipal supervisors; Action against shopkeeper in Dadar | पालिकेच्या पर्यवेक्षकांकडून कचरा टाकणाऱ्यांवर नजर; दादरमधील दुकानदारावर कारवाई

पालिकेच्या पर्यवेक्षकांकडून कचरा टाकणाऱ्यांवर नजर; दादरमधील दुकानदारावर कारवाई

मुंबई: रस्त्यावर फेकल्या जाणाऱ्या कचऱ्याविरोधात पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके ऍक्टिव्ह झाली आहेत. दुकानतला कचरा पिशवीत भरून रस्त्यावर टाकून दिल्यामुळे दादरमधील न चिं केळकर मार्गावरील एका दुकानदाराला पालिकेच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले आहे. कचऱ्याच्या पिशवीतील बिलावरून पालिकेच्या घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांनी दुकानदाराचा शोध घेऊन त्याच्याकडून दंड वसूल केला व त्याचे प्रबोधनही केले.

पालिकेचे सफाई कर्मचारी सकाळी सातपूर्वी रस्त्यावरील कचरा गोळा करून स्वच्छता करतात. मात्र त्यानंतर नऊ वाजता जेव्हा दुकाने उघडतात तेव्हा दुकानदार दुकानातील कचरा काढून तो तसाच रस्त्यावर फेकून देतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी ही मोहीम घेण्यात आल्याची माहिती  घनकचरा विभागाचे अधिकारी इरफान काझी  यांनी दिली. पालिकेच्या कचरा गाडीची दुसरी फेरी सकाळी ११ वाजता असते. त्यावेळी दुकानदारांनी कचरा देणे अपेक्षित आहे. मात्र दुकानदार हा कचरा सरळ रस्त्यावर ठेवतात त्यामुळे ही कारवाई केल्याचेही त्यांनी सांगितले.

न चिं केळकर मार्गावर अशीच कचऱ्याची पिशवी दिसल्यामुळे त्या पिशवीतील कचरा उचकटून पाहिला असता त्यात एका दुकानाचे बिल पर्यवेक्षकांना सापडले. त्या बिलावरून शोध घेऊन दुकानदाराला ५०० रुपये दंड करण्यात आला. अशा प्रकारे गेल्या काही दिवसांपासून कचरा कोणी टाकला त्याचा शोध घेण्याची मोहीम जी उत्तर विभागाने हाती घेतली आहे. कधी ब्रॅण्डेड शर्टाचे खोके, कधी दुकानाचे नाव असलेल्या पिशव्या अशा गोष्टींवरून हा कचरा कोणाचा याचा शोध घेतला जातो. तर कधीकधी कचरा कोणी टाकला त्याची माहिती फेरीवाले, अन्य दुकानदार सांगतात, कधी कधी दुकानांच्या सीसीटीव्हीची मदत घेऊनही कचरा टाकणाऱ्याचा शोध घेतला जातो. रस्त्यावर कचरा टाकण्याची सवय बदलण्याकरीता ही मोहीम घेतली असल्याची माहिती अधिकारी देत आहेत.

पर्यवेक्षकांच्या बाजारात फेऱ्या

पालिकेने संपूर्ण मुंबईत स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. मात्र अनेकदा दुकानदारांना, फेरीवाल्यांना, नागरिकांना स्वच्छता राखण्याची सवय नसते. त्यामुळे पुन्हा सर्वत्र कचरा दिसत असतो. अशा दुकानदारांना स्वच्छतेची सवय लावण्यासाठी पालिकेच्या जी उत्तर विभागातील घनकचरा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अनोखी मोहीमच हाती घेतली आहे. खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या दादर परिसरातील रस्त्यावर घनकचरा विभागाचे पर्यवेक्षक सतत फेऱ्या मारत असतात. त्यामुळे इथे कुठेही मोठ्या प्रमाणावर कचरा पडलेला दिसला की कचरा टाकणाऱ्याचा शोध घेऊन त्याचे प्रबोधन करण्याची अनोखी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Web Title: monitoring of litterers by municipal supervisors; Action against shopkeeper in Dadar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.