मोनिकाला बारावीत ६३ टक्के!
By Admin | Updated: May 28, 2015 01:29 IST2015-05-28T01:29:06+5:302015-05-28T01:29:06+5:30
रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावल्याने भविष्याचा प्रश्न निर्माण झाला. मात्र जिद्दीने पेटून उठले आणि पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.

मोनिकाला बारावीत ६३ टक्के!
मुंबई : रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावल्याने भविष्याचा प्रश्न निर्माण झाला. मात्र जिद्दीने पेटून उठले आणि पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. वर्षभराचा अभ्यास तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे आव्हान होते आणि ते आव्हानही सक्षमपणे पेलले, हे सांगताना मोनिकाचा आनंद ओसंडून वाहत होता. मुंबईतील रेल्वे अपघातात दोन्ही हात गमाविल्यानंतर मोनिकाने जिद्दीने लेखनिकाच्या सहाय्याने बारावीची परीक्षा दिली आणि ६३ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली. मोनिकाने मिळविलेल्या या यशामुळे तिच्यावर सगळ्याच स्तरावरुन कौतुक होत आहे.
घाटकोपरच्या एसएनडीटी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मोनिका मोरेचा २०१४ मध्ये रेल्वे अपघात झाला होता. या अपघातात तिला दोन्ही हात गमवावे लागले. त्यानंतर तिला कृत्रिम हात बसविण्यात आले. अपघात आणि त्यातून सावरण्यास लागलेला उशीर यामुळे मोनिकाचा सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी वाया गेला.
बारावीचे वर्ष वाया जाऊ देणार नाही, अशी जिद्द बाळगून तिने अभ्यास पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि तशी तयारीही केली. वर्षभराचा अभ्यास करण्यासाठी फक्त तीन महिने मिळाले. यात मला माझे आईवडील, शिक्षक आणि मित्रमैत्रिणींची चांगली साथ मिळाली. मला कॉलेजकडून परिक्षा देण्यासाठी एक लेखनिक देण्यात आली होती. ऐश्वर्या पवार नावाची असलेली ही लेखनिक माझ्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी असून ती आता बारावीत गेली आहे. तिच्यामुळे मी पेपर लिहू शकले आणि मोठी मदत मिळाल्याचे मोनिकाने सांगितले. कॉमर्समध्ये शिक्षण घेत असलेल्या मोनिकाने ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतरच
पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
राज्यात अपंग विद्यार्थ्यांची बाजी
पुणे : बुधवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालामध्ये अपंग विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. राज्याच्या एकूण निकालापेक्षा अपंग विद्यार्थ्यांचा निकाल सर्वाधिक ९१.३५ टक्के लागला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.२६ टक्के आहे.
अंध विद्यार्थी ९३.१६ टक्के, कर्णबधिर ८६.४६ टक्के, मूकबधिर ६८.८० टक्के, अस्थिव्यंग ९०.२५ टक्के, बहुविकलांग ९५.८८ टक्के तर अध्ययन अक्षमता असलेले टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षी अपंगांचा निकाल ८७.५२ टक्के लागला होता. ‘हम किसी से कम नही ’ हेच त्यांनी दाखवून दिले आहे.
ठाणे-पालघरचा निकाल ८८.३३%
च्महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेत ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा निकाल ८८.३३ टक्के लागला असून एकूण ९०.४८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये ९४.०८ टक्के मुली तर ८७.२८ टक्के मुले उत्तीर्ण झाली असून जिल्ह्यात मुरबाड ह्यनंबर वनह्ण ठरला आहे.
च्मुरबाडचा निकाल ९२.१६ टक्के लागला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये १ लाख ७८१ पैकी ९२ हजार ७६८ विद्यार्थी पास झाले आहेत. जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल ९३.३० टक्के, वाणिज्य शाखेचा ९१.०४, कला शाखेचा ८४.८९ तर व्यावसायिक शाखेचा ९२.०८ टक्के लागला आहे. एकूण ९ हजार ६५२ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांची सरासरी गाठली असून ३४ हजार ८८५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ४८ हजार १८३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ६ हजार २२ विद्यार्थी तृतीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
मोनिका मोरेला ६३ टक्के मिळाले असून बीके या विषयात १०० पैकी ८० गुण मिळाले आहेत. तिने मिळविलेल्या यशामुळे मुख्यमंत्र्यांसह खासदार आणि अनेक लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. मोनिकाची आई कविता मोरे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी मोनिकाच्या वडिलांना फोन करुन आम्ही तुमच्या पाठिशी असल्याचे सांगत शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई मंडळातील
पश्चिम विभागाची बाजी
मुंबई विभागीय मंडळातील पाच विभागांमध्ये पश्चिम विभागाने बाजी मारली आहे. या विभागाचा निकाल ९१.३६ टक्के लागला असून या विभागातील विज्ञान शाखेतील ९५.६३ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. ठाणे विभागाचा निकाल ९०.४८ टक्के, रायगडचा ९०.३६, दक्षिण मुंबईचा ८७.६१ आणि उत्तर शिक्षण विभागाचा निकाल ९०.१६ लागला आहे.
४ जूनला गुणपत्रिका
कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप ४ जून रोजी करता येईल. त्याच दिवशी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत दु. ३ वा. करण्यात येणार आहे. गुण पडताळणीसाठी विद्यार्थ्यांना १५ जूनपर्यंत अर्ज करता येईल. तर उत्तरपत्तिकांच्या छायांकित प्रतीसाठी विद्यार्थ्यांना मंडळाकडे १५ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे.
रायगड विभागातील २७ हजार विद्यार्थी उत्तीर्ण
रायगड विभागातून ३१ हजार १६४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामध्ये १७ हजार ५४ मुले आणि १४ हजार ११० मुलींनी परीक्षा दिली होती. यामधील १३ हजार ८६४ मुले आणि १३१०६ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. २६ हजार ९७० एकूण विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या विभागाचा निकाल ८६.५४ टक्के लागला आहे.
ठाणे विभागातून १ लाख विद्यार्थी उत्तीर्ण
मुंबई मंडळाच्या ठाणे विभागातून १ लाख ४ हजार ३२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या विभागाचा निकाल ८६.६० टक्के लागला आहे. या परीक्षेला १ लाख २० हजार ४७५ विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये ५४ हजार २८५ मुले आणि ५० हजार ४४ मुलींचा समावेश आहे. ८२.३८ टक्के मुले तर ९१.६९ टक्के मुली या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत.