महिलांकडून पैसे आकारणी सुरूच
By Admin | Updated: September 24, 2014 03:07 IST2014-09-24T03:07:31+5:302014-09-24T03:07:31+5:30
राइट टू पीच्या चळवळीला काही प्रमाणात यश येतानाचे चित्र मुंबईत दिसत असतानाच काही ठिकाणी अजूनही अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून आले

महिलांकडून पैसे आकारणी सुरूच
मुंबई : राइट टू पीच्या चळवळीला काही प्रमाणात यश येतानाचे चित्र मुंबईत दिसत असतानाच काही ठिकाणी अजूनही अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून आले आहे, तर काही ठिकाणी स्वच्छतागृहांमध्ये अजूनही महिलांकडून पैसे आकारले जात आहेत.
महिलांसाठी मोफत मुताऱ्या असाव्यात, यासंबंधी मुंबई शहराचा आढावा घेणाऱ्या बैठका महापालिकेने घेतल्या. आॅगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत मुंबईत महिलांसाठी मुताऱ्या मोफत व्हाव्यात, असे परिपत्रक महापालिकेतर्फे काढण्यात आले होते. मात्र आजही शहारामध्ये याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही. काही स्वच्छतागृहांमध्ये अजूनही महिलांसाठी मोफत मुताऱ्या कराव्यात, हा संदेश पोचलेला नाही़ यामुळे तिथेही राजरोसपणे पैसे आकारले जात आहेत. तर दुसरीकडे काही ठिकाणी ‘महिलांसाठी मोफत मुताऱ्या’ असे फलक लागलेले आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही. यामुळे राइट टू पी कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत.
ज्या ठिकाणी फलक लावले आहेत तिथे पूर्णपणे अंमलबजावणी झालेली नाही. कारण फलक लावून एक ब्लॉक हा मुतारीसाठी राखीव ठेवावा, असे सांगण्यात आले होते. मात्र अनेक ठिकाणी हा ब्लॉक राखीव ठेवण्यात आलेला नाही. याविषयी तिथल्या माणसाला विचारले, तर त्याचे उत्तर असते की, आम्ही त्यांना सांगतो, या ठिकाणी जा. मात्र प्रत्येक येणाऱ्या महिलेला असे सांगणे शक्य आहे का, ते असे करतील का, असा प्रश्न आरटीपी कार्यकर्ते दीपा पवार यांनी उपस्थित केला आहे.