Join us  

शिवडी - वरळी उन्नत मार्गाला लवकरच मुहूर्त  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2020 5:49 PM

Elevated road : पुढील महिन्यांत काम सुरू होण्याची शक्यता

मुंबई : गेल्या आठ वर्षांपासून चर्चेत असलेल्या शिवडी – वरळी उन्नत मार्गाचे काम लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली असून एमएमआरडीएने त्यांना नुकताच एओए (लेटर आँफ अँक्सेप्टन्स) दिला आहे. या कामासाठी १०५१ कोटी खर्च होणार आहेत.

शिवडी - न्हावा शेवा ट्रान्सहार्बर लिंक या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पावरून येणाऱ्या वाहतुकीसाठी शिवडी – वरळी उन्नत मार्ग अत्यंत गरजेचा आहे. ट्रान्सहार्बर लिंक सुरू होण्यापूर्वी जर हा उन्नत मार्ग सुरू झाला नाही तर या परिसरात प्रचंड मोठी वाहतूक कोंडी होईल आणि त्यानंतर या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात अनेक अडथळे निर्माण होतील. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हे काम तातडीने सुरू करण्याचे प्रयत्न एमएमआरडीएकडून सुरू आहेत.

साडेचार कि.मी. लांब आणि १७.२० मीटर रुंद असा हा शिवडी वरळी उन्नत मार्ग असेल. ८ वर्षांपूर्वीच्या प्रकल्प अहवालानुसार बांधकामाची खर्च ४९० कोटी तर, एकूण अंदाजीत किंमत ५१७ कोटी होती. आता अंदाजे  बांधकाम खर्च १०५२ कोटी आणि अंदाजे किंमत १२७६ कोटी रुपये झाली आहे. ट्रान्सहार्बर लिंकसाठी एमएमआरडीएने सर्वप्रथम बीओटी तत्वावर निविदा काढल्या होत्या. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शिवडी - वरळी मार्गाचे कामही सुरू करता आले नव्हते.  २०१७ साली ट्रान्सहार्बर लिंकसाठी नव्याने सुरू झालेली निविदा प्रक्रिया यशस्वी झाली. ते काम प्रत्यक्षात सुरूही झाले. मात्र, शिवडी वरळी मार्गाचे काम अधांतरीच होते. ते आता मार्गी लागले आहे.

पुनर्वसनाचे आव्हान

हे बांधकाम सुरू करण्यापूर्वी बाधितांच्या पुनर्वसनाची कार्यवाही एमएमआरडीएला करावी लागणार आहे. स्थानिकांच्या पुनर्वसनासाठी सुमारे ४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे मोठा आव्हान एमएमआरडीएसमोर असेल.

 

टॅग्स :एमएमआरडीएरस्ते वाहतूकरस्ते सुरक्षा