Join us

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला लवकरच मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 16:03 IST

Shiv Sena : स्मारकासाठी होणार किमान १८४ कोटींचा खर्च

पुढच्या आठवड्यात कामाची सुधारित निविदा

मुंबई : गेल्या पाच वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या शिवाजी पार्क महापौर बंगल्यातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या उभारणीची मुहुर्तमेढ लवकरच रोवली जाण्याची चिन्हे आहेत. या स्मारकाची सुधारित रचना अंतिम करण्यात आली असून त्यासाठी किमान १८७ कोटी रुपये खर्च होतील असा अंदाज आहे. जुन्या आराखड्यानुसार तो खर्च ७८ कोटी रुपये होता. या कामासाठी ५ नोव्हेंबर रोजी एमएमआरडीए निविदा प्रसिध्द करणार असल्याची माहिती हाती आली आहे.

शिवसेनाप्रमुखांचे स्मारक शिवाजी पार्कजवळील महापौर बंगल्यात उभारण्यात येईल, अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १६ नोव्हेंबर, २०१५ मध्ये केली होती. त्यानंतर या स्मारकासाठी समिती नियुक्त करण्यात आली. महापौरांचे निवासस्थान भायखळा येथील जीजामाता उद्यानातील अतिरिक्त आयुक्तांच्या बंगल्यात स्थलांतरित करण्यात आले. महापौर निवास ही पुरातन वास्तू असल्याने तिला धक्का न लावता जमिनीच्याखाली बांधकाम करण्याचा निर्णय झाला. इथे वृक्ष तोड होणार नाही असे आश्वासनही देण्यात आले. या कामासाठी सुधारित विकास आराखड्यात जमीन वापराबाबतचे आवश्यक ते बदल मंजूर झाले आहेत.

स्मारकाच्या मार्गातील विविध अडथळ्यांवर मात करत एमएमआरडीएने फेब्रुवारी २०१९ मध्ये या कामासाठी निविदा प्रसिध्द केल्या होत्या. मात्र, सुमारे ७८ कोटी रुपये अंदाजखर्च असललेया या प्रक्रियेतील लघुत्तम निविदाकाराचे दर तब्बल ५४.५ टक्के जादा दराने बोली लावली होती. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यानंतर या स्मारकाचा सुधारित आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या कामासाठी सुमारे १०० कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूदही मार्च, २०२० मध्ये मंत्रिमंडळाने केली आहे. सुधारित आराखडा मंजूर झाला असून त्या आधारे नवी निविदा काढली जाणार आहे. त्यानुसार मुख्य स्मारकातील काही बदलांसह सभोवतालच्या परिसरात आर्ट गँलरी, ग्रंथालय, सेमिनार हाँल, लेक्चर हाँल, पर्यटक केंद्र, कँफेटेरिया, स्वच्छतागृहे , पार्किंग प्लाझा आदी सेवा सुविधा या ठिकाणी उभारल्या जाणार असल्याची माहिती हाती आली आहे.  

… तर दीड वर्षांत काम पूर्ण

या स्मारकाची निविदा प्रक्रिया पहिल्या टप्प्यातच यशस्वी झाली तर जानेवारी महिन्यात पात्र कंपनीला कामाची वर्क आँर्डर देता येईल. त्यानंतर काम पूर्ण करण्याचा कालावधी १४ महिन्यांचा असेल. त्यामुळे जर या प्रक्रियेत कोणतेही विघ्न आले नाही तर पुढील दीड वर्षांत या स्मारकाचे काम पूर्ण होईल असे एमएमआरडीएतल्या अधिका-यांचे म्हणणे आहे.   

टॅग्स :शिवसेनामुंबईमुंबई महानगरपालिकासरकार