धारावीत गुंडाकडून महिलेचा विनयभंग

By Admin | Updated: December 8, 2014 01:31 IST2014-12-08T01:31:32+5:302014-12-08T01:31:32+5:30

शौचालयावरून परतत असलेल्या एका महिलेची स्थानिक गुंडाने छेड काढल्याची घटना शनिवारी धारावी येथे घडली

Molestation of woman from Dharavi gang | धारावीत गुंडाकडून महिलेचा विनयभंग

धारावीत गुंडाकडून महिलेचा विनयभंग

मुंबई : शौचालयावरून परतत असलेल्या एका महिलेची स्थानिक गुंडाने छेड काढल्याची घटना शनिवारी धारावी येथे घडली. याबाबत महिलेने धारावी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली. मात्र पोलिसांनी केवळ एनसी घेऊन हे प्रकरण इथेच बंद केले.
सायनच्या नाईक नगरमध्ये ही पीडित महिला कुटुंबीयांसोबत राहते. शनिवारी सकाळी शौचालयातून बाहेर येत असताना याच परिसरातील अफसर आझाद या गुंडाने तिला रस्त्यात अडवून छेड काढली. मात्र महिलेने त्याकडे दुर्लक्ष करीत घर गाठले. त्यानंतर घडलेला प्रकार पतीला सांगितला. तिच्या पतीने तत्काळ याबाबत अफसरकडे विचारणा केली असता, या गुंडाने त्याला देखील बेदम मारहाण केली. तसेच पुन्हा सायंकाळी त्यांच्या घरी जाऊन त्यांना जातिवाचक शिविगाळ करून मुंबई सोडण्याची धमकी दिली. अखेर रात्री १० वाजताच्या सुमारास हे पती-पत्नी धारावी पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी सकाळी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. मात्र पोलिसांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत रात्री एकपर्यंत त्यांना पोलीस ठाण्यातच बसवून ठेवले. त्यानंतर केवळ एनसी घेऊन दोघांना घरी धाडले. अफसर हा एका राजकीय पक्षाशी निगडीत असून, त्याच्यावर खंडणी, मारामारी, छेडछाड असे गुन्हे दाखल आहेत. तर, आज रजेवर असल्याने मला याबाबत काहीच कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया धारावीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम मोरे यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Molestation of woman from Dharavi gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.