मंत्रालयात ‘मॉक’री ड्रिल!

By Admin | Updated: May 31, 2015 02:09 IST2015-05-31T02:09:29+5:302015-05-31T02:09:29+5:30

मंत्रालयाच्या मेकओव्हरनंतर शनिवारी पहिल्यांदाच मॉक ड्रिल झाली पण तिचे स्वरूप पाहता ती अशा प्रकारच्या ड्रिलची थट्टा (मॉकरी) करणारी होती, असे वाटून गेले.

Mokhri drill! | मंत्रालयात ‘मॉक’री ड्रिल!

मंत्रालयात ‘मॉक’री ड्रिल!

मुंबई : मंत्रालयाच्या मेकओव्हरनंतर शनिवारी पहिल्यांदाच मॉक ड्रिल झाली पण तिचे स्वरूप पाहता ती अशा प्रकारच्या ड्रिलची थट्टा (मॉकरी) करणारी होती, असे वाटून गेले.
तीन वर्षांपूर्वी मंत्रालयाला भीषण आग लागली होती. त्यानंतर मंत्रालयाच्या मेकओव्हरचे काम अजूनही सुरूच आहे. आधीच्या मंत्रालयात आग लागली तेव्हा पाच जण दगावले होते; आता आग लागली तर त्यापेक्षा मोठी हानी होईल, असे आताच्या नव्या वास्तूचे स्वरूप असल्याचे अनेकदा बोलले जाते.
या पार्श्वभूमीवर, नवे मंत्रालय सुरक्षित असल्याचे सामान्य प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दाखवायचे असावे. म्हणूनच की काय आज मॉक ड्रिल घेण्यात आले. त्याचे स्वरूप मात्र हास्यास्पद होते. मंत्रालयात अचानक घंटा वाजू लागली पण मॉक ड्रिलची आधीच  कल्पना असल्याने २५ टक्केही कर्मचारी मंत्रालय सोडून खाली आवारात जमले नाहीत. बहुतांश सचिव आपल्या दालनातच बसून होते. जे आले ते आरामात आले. कारण, आग वगैरे काही लागलेली नाही याची त्यांना पूर्ण कल्पना होती. गप्पाटप्पा मारत ते उतरले. काहीजण चहाला निघून गेले.
मॉक ड्रिल असले तरी काही क्षण थरार असतो. आणिबाणीचा प्रसंग उद्भवल्याचे चित्र निर्माण केले जाते. तसे काहीही जाणवत नव्हते. त्यामुळे २५० कोटी रुपये खर्चून झालेले मंत्रालयाचे मेकओव्हर आणिबाणीच्या प्रसंगात सुरक्षित आहे की नाही याचे नेमके उत्तर मिळू शकले नाही. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Mokhri drill!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.