मोखाड्याचे रूग्णालयच अत्यवस्थ
By Admin | Updated: June 19, 2015 21:53 IST2015-06-19T21:53:54+5:302015-06-19T21:53:54+5:30
नव्याने अस्तित्वात आलेल्या पालघर जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या मोखाडा तालुक्यातील आदिवासी शासनाच्या उदासीन धोरणामुळे दारिद्र्यात

मोखाड्याचे रूग्णालयच अत्यवस्थ
मोखाडा : नव्याने अस्तित्वात आलेल्या पालघर जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या मोखाडा तालुक्यातील आदिवासी शासनाच्या उदासीन धोरणामुळे दारिद्र्यात खितपत पडले आहेत. तालुक्याची लोकसंख्या लाखावर पोहोचली असून संपूर्ण तालुक्याच्या आरोग्याची काळजी घेणारे मोखाडा ग्रामीण रूग्णालयच सोयीसुविधांअभावी अत्यवस्थ झाले आहे. त्यामुळे आदिवासी जनतेची उपचाराविना फरफट होत आहे.
तालुक्यातील गावपाडे २० ते २५ कि. मी. अंतरावर वसले आहेत. येथून रोजच मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात येतात. परंतु रुग्णालयात अपुरे कर्मचारी असून त्यांचाही मनमानी कारभार आहे. रुग्णालयात डॉक्टर आहे तर नर्स नाही, नर्स आहे तर डॉक्टर नाही. अशी परिस्थिती असल्याने जनतेत असंतोष असून ते आंदोलनाच्या तयारीत आहेत.
या रूग्णालयात एकूण ७ परिचारीका मंजूर आहेत. त्यापैकी ५ पदे भरलेली आहेत. यामधील २ पदे रिक्त असून काही महिन्यांपासून तीन परिचारीका रजेवर आहेत. त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या आदिवासींचे अतोनात हाल होत आहेत. रूग्णालयात आणखी डॉक्टर असणे आवश्यक आहे.
मात्र सध्या तरी दोनच डॉक्टर उपलब्ध असल्याने एका डॉक्टरावर वैद्यकीय अधीक्षक पदाचा भार आहे. यामुळे रोजच उपचारासाठी शेकडो बांधवांना एकच डॉक्टरावर अवलंबून राहावे लागत असून परिणामी, रूग्णांना वेळीच उपचार उपलब्ध होत नाही.
मोखाडा तालुका कुपोषण, बालमृत्यू, साथीचे आजार यामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. असे असताना देखील येथे बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, भूलतज्ज्ञांचा आभाव आहे. तसेच या रूग्णालयात अद्ययावत सुविधा नसल्याने येथील रूग्णाना जव्हार किंवा नाशिक गाठावे लागते. तर प्रसंगी खाजगी दवाखान्यात महागडा उपचारही घ्यावा लागतो. ही स्थिती बदलणार कधी? असा जनतेचा सवाल आहे.
(वार्ताहर)