मुंबईत मोदी लाट, सेनेची सरशी

By Admin | Updated: October 20, 2014 03:22 IST2014-10-20T03:22:45+5:302014-10-20T03:22:45+5:30

संपूर्ण राज्यात मोदी लाट चालो न चालो, सरकार बहुमतात येवो अथवा न येवो मुंबई मात्र मोदी लाट चालल्याचे निकालावरुन स्पष्ट झाले आहे.

Modi wave in Mumbai, Sanechi Sarashi | मुंबईत मोदी लाट, सेनेची सरशी

मुंबईत मोदी लाट, सेनेची सरशी

मुंबई : संपूर्ण राज्यात मोदी लाट चालो न चालो, सरकार बहुमतात येवो अथवा न येवो मुंबई मात्र मोदी लाट चालल्याचे निकालावरुन स्पष्ट झाले आहे. मुंबईत अवघ्या तीन सभा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपला गेल्या विधानसभेच्या तिप्पट अर्थात ५ जागांच्या १५ जागा करुन दिल्या आहेत. भाजपशी दोन हात करत शिवसेनेने देखील मुंबईत घवघवीत यश संपादन केले आहे. शिवसेनेने मुंबईतील १४ जागांवर कब्जा मिळवला.
भाजपसह ही शिवसेनेचीही लाट होती, हे शिवसेनेच्या १४ आमदारांनी दाखवून दिले आहे. मुंबईत सर्वाधिक नुकसान काँग्रेसचे झाले असून काँग्रेसच्या १७ जागांपैकी अवघ्या ५ जागा काँग्रेसला राखता आल्या. काँग्रेसने २००९ मध्ये मनसे इफेक्टमुळे मिळवलेल्या तब्बल १७ जागांपैकी केवळ ५ जागा वाचवण्यात काँग्रेसला यश आले. तर भाजप आणि शिवसेनेच्या धुराळ््यात मनसे आणि राष्ट्रवादी पूर्णपणे भुईसपाट झाली आहे.
काँग्रेसच्या दिग्गजांना शिवसेना आणि भाजपाने जोरदार हादरे दिले आहेत. अनेक दिग्गजांचे बालेकिल्ले नेस्तनाबूत करण्याची कामगिरी या दोन्ही पक्षांनी साधली आहे.
समाजवादी पार्टीने मानखुर्द -शिवाजीनगरची जागा अबू आझमी यांनी राखली आहे. तर एमआयएमने पहिल्याच प्रयत्नात खाते उघडून भायखळ््यात झेंडा रोवला. मुंबईतील चंचूप्रवेश एमआयएमसारख्या पक्षासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. एकीकडे मनसे मुंबईत खात उघडू शकलेली नसताना एमआयएमने मिळवलेली मोक्याची जागा बरच काही सांगून जाणारी आहे.
काँग्रेसच्या निवडून आलेल्या ५ आमदारांपैकी ३ आमदार अल्पसंख्याक समाजाचे आहेत. काँग्रेसने काही प्रमाणात का होईना, वोटबँक राखण्याचा प्रयत्न केल्याचे निकालातून दिसून येते. काँग्रेसच्या दिग्गजांना धूळ चारण्यात शिवसेनेने बाजी मारली आहे. मुंबईत राष्ट्रवादीने असलेल्या तिन्ही जागा गमावल्या आहेत. राष्ट्रवादीचे अस्तित्वच मुंबईतून पुसले गेल्याने भविष्यात मुंबईत पुन्हा उभे राहण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर असेल. राष्ट्रवादीचे पराभूत झालेले तिन्ही उमेदवार दिग्गज असल्याने आता त्यांच्या पुढच्या वाटचालीकडेही लक्ष राहिल.

Web Title: Modi wave in Mumbai, Sanechi Sarashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.