Join us  

मोदी सरकार ‘चले जाव’, तिरंगा मार्चमध्ये काँग्रेसची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 1:53 AM

ब्रिटिशांची चापलुसी करणाऱ्यांचे अनुयायी सत्तेवर असून ते देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करीत आहेत

मुंबई : ब्रिटिशांची चापलुसी करणाऱ्यांचे अनुयायी सत्तेवर असून ते देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, देशातील सामाजिक सुरक्षितता, सामाजिक सद्भाव संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे मोदी सरकारविरोधात ‘चले जाव’ची लढाई लढावी लागणार आहे. त्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी गुरुवारी केले.आॅगस्ट क्रांती दिनानिमित्त गुरुवारी प्रदेश काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसने तिरंगा मार्चचे आयोजन केले होते. आॅगस्ट क्रांती मैदान ते मणी भवन दरम्यान हा मार्च काढण्यात आला. तत्पूर्वी क्रांती मैदानात स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन आणि स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार सोहळा पार पडला. या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना चव्हाण म्हणाले की, महात्मा गांधी यांनी ‘चले जाव’ आंदोलनाची हाक दिली आणि जात, धर्म, पंथ विसरून देशवासी या आंदोलनात सहभागी झाले. परंतु ज्यांनी त्या वेळी या आंदोलनाला विरोध करून ब्रिटिशांची चापलुसी केली त्यांचेच अनुयायी सत्तेवर आहेत. भाजपा सरकारने पुन्हा पारतंत्र्यासारखी परिस्थिती देशावर आणली आहे. सरकारच्या चुकीच्या निर्णयांविरोधात बोलणाºयांना देशद्रोही ठरवले जात आहे. लोकांनी काय खायचे? कोणते कपडे वापरायचे? यावर बंधने आणली जात आहेत. गोरक्षणाच्या नावाखाली दलित, अल्पसंख्याक समाजातील निष्पाप लोकांच्या कत्तली केल्या जात आहेत. समाजविघातक प्रवृत्तींना बळ देणाºया भाजपा सरकारला ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आली आहे, असे चव्हाण म्हणाले.सामाजिक एकता, सांप्रदायिक सद्भाव आणि एक सहनशील देशभक्तीची भावना लोकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी हा तिरंगा मार्च काढण्यात आल्याचे संजय निरुपम म्हणाले. या मार्चमध्ये काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :अशोक चव्हाण