Join us  

मोदी सरकारचा भारत पेट्रोलियम कंपनी रिलायन्सला द्यायचा घाट- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 8:03 PM

मनसे प्रमुख राज ठाकरेंनी भांडुपमध्ये प्रचारसभा घेऊन भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

मुंबई- मनसे प्रमुख राज ठाकरेंनी भांडुपमध्ये प्रचारसभा घेऊन भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.  देशातली सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी लवकरच खासगी हातात जाणार असून, केंद्र सरकार भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल)मधील 53 टक्के भागीदारी विकणार आहे. त्याच मुद्द्यावरून राज ठाकरेंनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. नोटबंदीच्या दहाव्या दिवशी मी बोललो होतो की सरकारच्या ह्या निर्णयामुळे उद्योगधंदे बंद पडत जाणार, देशावर बेकारीचं सावट येणार आणि तसंच घडलं, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड(बीपीसीएल) रिलायन्सला द्यायचा घाट सुरू असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला आहे. बीपीसीएलमधल्या लोकांच्या नोकऱ्या जात आहेत, नवीन नोकऱ्या निर्माण होत नाहीयेत, ही वेळ आणली कोणी?, असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. पुढे ते म्हणाले, आझाद मैदानावर रझाकारांच्या मोर्च्याच्या वेळेस रझाकारांनी पोलिसांवर हात उचलला, त्यावेळेस बाकीचे पक्ष शेपट्या घालून बसले होते, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चा काढला होता आणि पोलिसांवरच्या हल्ल्याचा निषेध नोंदवला होता. एल्फिन्स्टनच्या दुर्दैवी अपघातानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे आंदोलन केलं, त्यामुळे स्टेशन परिसर फेरीवालामुक्त झाला.पण पुन्हा तो परिसर सरकारी आशीर्वादाने फेरीवाल्यानी भरले. आंदोलनं आम्ही करायची, सरकार काहीच करणार नाही, तरीही माध्यमं मला विचारणार की तुम्ही आंदोलनं अर्धवट सोडता?, टोलमुक्त महाराष्ट्र करू, असं भाजपाचं जाहीरनाम्यात आश्वासन दिलं होत? कुठे झाला टोलमुक्त महाराष्ट्र? जे टोल 78 बंद झाले ते टोल महाराष्ट्र सैनिकांच्या दणक्यामुळे झाले, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.  दरम्यान, रागाला आवाज द्यायचा असेल तर सक्षम विरोधी पक्ष हवाय. आज विरोधी पक्षाचे नेतेच सत्ताधाऱ्यांच्यात जाऊन बसलाय. माझे उमेदवार तरुण आहेत, त्यांच्या पोटात आग आहे, ते आज तुमच्यातले आहेत आणि उद्या आमदार म्हणून निवडून आल्यावर तुमच्यातलेच बनून राहतील, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.  

टॅग्स :राज ठाकरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019