मोदींनी अच्छे नहीं, ‘बुरे दिन’ आणले

By Admin | Updated: August 15, 2014 00:19 IST2014-08-15T00:09:43+5:302014-08-15T00:19:35+5:30

राणेंची टीका : विरोधकांना जेरीस आणणार

Modi did not bring good, 'bad days' | मोदींनी अच्छे नहीं, ‘बुरे दिन’ आणले

मोदींनी अच्छे नहीं, ‘बुरे दिन’ आणले

रत्नागिरी : भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी जनतेसमोर ‘अच्छे दिन’चे वातावरण तयार केले. मात्र, केंद्रातील सत्ता मिळाल्यानंतर त्यांनी सर्वसामान्य लोकांवर ‘बुरे दिन’ आणले आहेत. हाच मुद्दा घेऊन आपण येणाऱ्या विधानसभा निवडणुकांना सामोरे जाऊ. काँग्रेसचा प्रचार समिती प्रमुख म्हणून हीच भूमिका घेत विरोधकांना जेरीस आणण्यावर आपला भर असेल, असे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सांगितले.
रत्नागिरी विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष रमेश कीर उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा पराभव पत्करावा लागला. मोदी आणि भाजप यांनी अनेक आश्वासने दिली आणि लोकांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले. त्यामुळेच काँग्रेसचा पराभव झाला. मात्र, केंद्रात मोदी यांचे सरकार विराजमान झाल्यानंतर रेल्वे तिकीट दर, पेट्रोल, डिझेल, भाज्या या सर्वच क्षेत्रांत महागाई झाली आहे. त्यामुळे ‘अच्छे दिन’चे स्वप्न पाहणाऱ्या जनतेवर ‘बुरे दिन’ आले आहेत. हीच बाब आता विधानसभा निवडणुकीत आपण लोकांसमोर घेऊन जाणार आहोत. थापा मारणाऱ्यांना मत देऊ नका, हेच लोकांना आम्ही पटवून देऊ, असे ते म्हणाले. गुजरातपेक्षा महाराष्ट्र प्रत्येक गोष्टीत कसा पुढे हेही आपण लोकांसमोर मांडणार असल्याचे ते म्हणाले. /पान ११ वर

उद्धव ठाकरे यांची सरपंच होण्याची पात्रता नाही
कोल्हापूर : मुख्यमंत्री होण्यासाठी उतावीळ झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साधी सरपंच होण्याचीही पात्रता नाही, अशी बोचरी टीका आज, गुरुवारी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांनी येथे केली. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. /वृत्त ३

गावांची मते घेणार
इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये समाविष्ट असलेल्या गावांची मते घेऊन राज्य सरकार केंद्र सरकारला पुनर्विचाराचा प्रस्ताव सादर करेल. कोकणात मुळातच सीआरझेड, वनखात्याचे निर्बंध आहेत. त्यामुळे विकासावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे ‘इको’वर निर्बंध आणावेत, असे पत्र आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले असल्याचे ते म्हणाले.

जाणाऱ्यांनी खुशाल जावे
आपल्याबरोबर काँग्रेसमध्ये आलेले काहीजण आता काँग्रेस सोडून शिवसेनेत जात आहेत; पण त्यामुळे आपल्याला काहीच फरक पडत नाही. त्यांच्या जाण्याने माझे काहीच नुकसान होणार नाही. उलट माझा हात सोडल्यामुळे त्यांचे बुरे दिन सुरू होतील. त्यामुळे जायचे असेल त्यांनी खुशाल जावे, असा टोला नारायण राणे यांनी हाणला.

Web Title: Modi did not bring good, 'bad days'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.