गरीब मुलांसाठी झटणारी आधुनिक ‘सावित्रीची लेक’
By Admin | Updated: March 4, 2015 22:25 IST2015-03-04T22:25:47+5:302015-03-04T22:25:47+5:30
शाळा, अभ्यास, ट्युशन या सगळ््यांमध्ये मग्न असलेली मुले आपल्या शहरात नक्कीच पाहायला मिळतील. याच शहरातील बऱ्याचशा मुलांना शाळा म्हणजे नेमके काय? अभ्यास काय असतो? हेच ठाऊक नसते.

गरीब मुलांसाठी झटणारी आधुनिक ‘सावित्रीची लेक’
प्राची सोनवणे - नवी मुंबई
शाळा, अभ्यास, ट्युशन या सगळ््यांमध्ये मग्न असलेली मुले आपल्या शहरात नक्कीच पाहायला मिळतील. याच शहरातील बऱ्याचशा मुलांना शाळा म्हणजे नेमके काय? अभ्यास काय असतो? हेच ठाऊक नसते. नवी मुंबईसारख्या शहरात शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित मुलांना शिक्षणाचे धडे देणारी ज्ञानज्योती वर्ल्डवुमन लीडरशिप काँग्रेस हा पुरस्कारप्राप्त सुप्रभा रावराणे आदर्शवत ठरली आहे.
एक विकसित शहर म्हणून आज नवी मुंबईची ओळख आहे. याच शहरात कामानिमित्त स्थलांतरित झालेल्या लोकांबरोबरच येथे झोपडपट्ट्याही वाढत आहेत. याठिकाणी राहणाऱ्या मुलाला शाळेत पाठविणे ही संकल्पनाही इथल्या लोकांना मान्य नसते. अशा मुलांना जर प्राथमिक शिक्षण दिले गेले तर ती मुले भविष्यात आगळी ओळख निर्माण करू शकतात, हा विचार एकसारखा जिच्या मनात यायचा ती तरुणी म्हणजेच सुप्रभा रावराणे.
२८ वर्षांच्या या तरुणीने आपल्या बी.टेकच्या पदवीनंतर समाजकार्याला खरी सुरुवात केली. नवी मुंबईत परिसरात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या बांधकाम साईटवरील लहान मुलांना कधीही शाळेत पाठविले जात नाही, त्यांना रस्त्यावरील सिग्नलवर, मंदिराच्या परिसरात भीक मागण्यासाठी पाठविले जाते. मग याच मुलांचे भविष्य काय? याचा सारासार विचार करून सुप्रभाने त्यांच्यासाठी शिकवणीचे काम हाती घेतले.
सीबीडी सेक्टर-८ मधील वस्ती, बेलापूर सेक्टर-१५ मधील बांधकाम क्षेत्रातल्या वस्ती, खारघर, नेरुळ, तुर्भे, वाशी अशा वस्तीमध्ये तिने आपली शाळा सुरू केली. सुरुवातीला हे सारे खूपच अवघड होते. दारोदारी जाऊन लोकांना शिक्षणाची महती सांगून, त्यांच्या मुलांना शाळेत पाठवण्यास सांगणे हे एक जिकिरीचे काम होते. या साऱ्या प्रश्नांना सामोरे जाऊन तिने त्या शाळा सुरू केल्या. अभ्यासाबरोबरीनेच नृत्य, नाटक, संगीत आणि खेळाचेही प्रशिक्षण दिले. आज याच मुलांमधली ७० टक्के मुले शाळेत जात आहेत.
सुप्रभा डी. वाय. पाटील, नेरुळ तसेच सी. के. टी., पनवेल या कॉलेजमधील विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहेत. पटेल स्मारक, वाळकेश्वर यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत केली जाते.
नवी मुंबईतील गरजू मुलांसाठी सांस्कृतिक कला केंद्र उपलब्ध करून द्यायची माझी इच्छा आहे. तरुणांना मला एकच सांगावेसे वाटते की, समाजाला पुढे नेण्याचे काम हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. पैसा मिळवण्यासाठीच काम न करता समाजासाठी काम कराल तर नक्कीच आपल्या देशाची प्रगती होईल.
-सुप्रभा रावराणे, समाजसेविका