Join us
Daily Top 2Weekly Top 5

संतोष माने सुधारल्याने त्याचा समाजास धोेका नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 03:24 IST

बेदरकारपणे चालवून नऊ निष्पाप नागरिकांचे चिरडून बळी घेणारा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा बडतर्फ चालक संतोष मारुती माने हा आता समाजासाठी धोका राहिलेला नाही, असा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने काढला आहे.

मुंबई : वरिष्ठाने ड्युटी बदलून देण्यास नकार दिल्यावर पुण्याच्या स्वारगेट आगारात उभी असलेली एक बस पळवून आणि नंतर ती शहराच्या गजबलेल्या रस्त्यांमधून सुमारे १५ किमी बेदरकारपणे चालवून नऊ निष्पाप नागरिकांचे चिरडून बळी घेणारा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा बडतर्फ चालक संतोष मारुती माने हा आता समाजासाठी धोका राहिलेला नाही, असा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने काढला आहे.माने यास ठोठावलेली फाशीची शिक्षा अपिलात रद्द करून त्याऐवजीत्याला जन्मठेप देण्याचे न्या. ए. के. सिक्री, न्या. एस. अब्दुल नझीर व न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने ९ जानेवारी रोजी दिलेले निकालपत्र उपलब्ध झाले आहे. माने याने केलेला हा गुन्हा विरळात विरळा यात मोडणारा आहे व त्याच्यासारखी व्यक्ती जिवंत राहणे शांतता व सलोख्याने राहणाऱ्या समाजास धोका आहे, असे म्हणून उच्च न्यायालयाने माने याची फाशी कायम केली होती.मात्र हे अमान्य करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, हे कृत्य आपल्याकडून वेडाच्या भरात घडले हे माने सिद्ध करू शकला नसला तरी त्यावेळी तो मानसिक तणावाखाली होता हे उघड आहे. अन्यथा तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नाही. त्याची प्रवत्ती गुन्हेगारीची होती, असे अभियोग पक्ष दाखवू शकलेला नाही. सहा वर्षे तुरुंगातील त्याचे वर्तन समाधानकारक आहे. तो सुधारण्याची खूपच शक्यता आहे. केल्या कृत्याचा त्याला पश्चात्ताप होत असल्याने एव्हाना तो सुधारलेलाही असेल. त्यामुळे तो जिवंत राहणे समाजाला धोकादायक ठरेल, असे आम्हाला वाटत नाही.