पोलीस ठाण्यात मॉडेलचा धिंगाणा
By Admin | Updated: May 29, 2015 01:33 IST2015-05-29T01:33:10+5:302015-05-29T01:33:10+5:30
अभिनेत्री, मॉडेल पूजा मिश्रा आणि तिची मैत्रीण श्रुती गुप्ता या दोघींनी २२ मेच्या मध्यरात्री अंधेरीच्या डी. एन. नगरपोलीस ठाण्यात धिंगाणा केला.

पोलीस ठाण्यात मॉडेलचा धिंगाणा
मुंबई : अभिनेत्री, मॉडेल पूजा मिश्रा आणि तिची मैत्रीण श्रुती गुप्ता या दोघींनी २२ मेच्या मध्यरात्री अंधेरीच्या डी. एन. नगरपोलीस ठाण्यात धिंगाणा केला. नशेत तर्रर्र असलेल्या या दोघींनी पोलीस ठाण्यातच अधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. त्यांना आवरण्यासाठी गेलेल्या माहिला पोलिसांना धक्काबुक्की व मारहाणही केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघींविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
बिग बॉस, बिग स्वीच या रिअॅलिटी शोमध्ये पूजा सहभागी झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मे रोजी मध्यरात्री २च्या सुमारास पूजा व श्रुती वर्सोवा-जुहू रोडवरील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी थांबल्या होत्या. तेव्हा तेथे एक आॅडी कार येऊन थांबली. आॅडीतून एक तरुण एटीएममध्ये आला. तो पैसे काढून कारकडे परतला तेव्हा दोघींनी ‘हमे आयटम कौन बोला?’ असे विचारात वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांच्या गाडीवर जोरजोरात हात मारून नंतर आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून स्थानिकही या ठिकाणी जमा झाले. त्याचवेळी डी.एन. नगर पोलीस ठाण्याची गस्तीवरील व्हॅन तेथे पोहोचली. प्रकार जाणून घेत पोलिसांनी पूजा, श्रुतीसह आॅडीतल्या तरुणांनाही पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले.
दरम्यान, कारवाईच्या भीतीने आॅडीतल्या तरुणांनी कारसह तेथून पळ काढला. मात्र थोड्याच अंतरावर लागलेल्या नाकाबंदीत ही कार अडविण्यात आली.
डी.एन. नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी नलावडे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, एटीएमजवळच या दोघींनी पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या दोघीही त्या वेळी नशेत तर्रर्र होत्या. एटीएमजवळ पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी दोघींना पोलीस ठाण्यात येऊन तक्रार देण्याची विनंती केली होती. मात्र मोबाइल नंबर पोलिसांकडे देऊन त्या घरी गेल्या. काही वेळाने आॅडीतल्या चौघांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
तेव्हा पूजालाही फोन करून पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. तीन-साडेतीनच्या सुमारास दोघी पोलीस ठाण्यात आल्या. मात्र कारमधून उतरताच त्या पोलिसांना शिव्या देऊ लागल्या. पोलीस ठाण्यातल्या टेबलावर जोरजोरात हात आपटू लागल्या. इतकेच काय तर आॅडीतील तरुणांना ओळखण्यासही त्यांनी नकार दिला. उलट खरे आरोपी तुम्ही पळवून लावलेत, हे भलतेच आहेत, असा आरोपही करू लागल्या. त्यानंतर या दोघींना आवरण्यासाठी पुढे सरसावलेल्या महिला पोलिसांशी दोघींनी झटापट केली. पोलीस उपनिरीक्षक आणि ड्युटी आॅफिसर अनुराधा पाटील यांचे केस खेचून त्या दोघी मारहाण करू लागल्या. त्यांना सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस हवालदार रुणाली मुकल यांना लाथ मारली. तसेच सुनीता पाटील यांनाही मारहाण केली.
या दोघींचा धिंगाणा पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू होता, जो सीसीटीव्हीत कैद आहे. पहाटे ५च्या सुमारास या दोघी पोलीस ठाण्यातून पसारही झाल्या, असेही नलावडे यांनी सांगितले. पूजा व श्रुतीविरोधात सरकारी कामात अडथळा, मारहाण, शिवीगाळ या कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दोघींना लवकरच अटक होईल, असे पोलिसांनी सांगितले.
या दोघींचा धिंगाणा पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू होता, जो सीसीटीव्हीत कैद आहे. पहाटे ५च्या सुमारास या दोघी पोलीस ठाण्यातून पसारही झाल्या, असेही नलावडे यांनी सांगितले. पूजा व श्रुतीविरोधात सरकारी कामात अडथळा, मारहाण, शिवीगाळ या कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दोघींना लवकरच अटक करण्यात येईल.