अतिक्रमण विभागाने हटविले मोबाइल टॉवर
By Admin | Updated: June 7, 2015 00:14 IST2015-06-07T00:14:17+5:302015-06-07T00:14:17+5:30
सीबीडी सेक्टर ८ बमधील अल्-मोमीन शाळेच्या इमारतीवर विनापरवाना मोबाइल टॉवर उभारण्यात आले होते.

अतिक्रमण विभागाने हटविले मोबाइल टॉवर
नवी मुंबई : सीबीडी सेक्टर ८ बमधील अल्-मोमीन शाळेच्या इमारतीवर विनापरवाना मोबाइल टॉवर उभारण्यात आले होते. स्थानिक रहिवाशांनी लोकमतच्या माध्यमातून टॉवर हटविण्याची मागणी अतिक्रमण विभागाकडे केली. शनिवारी सकाळी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली.
मागील आठवड्यात सीबीडीमधील नागरिकांनी लोकमतला अतिक्रमण विभाग तसेच टाऊन प्लॅनिंग अधिकाऱ्यांना या बेकायदेशीर मोबाइल टॉवर संदर्भात माहिती दिली. अतिक्रमण विभागाने या प्रकरणी त्वरित लक्ष घालून कायदेशीर कारवाई केली. या परिसरात याआधीही अनधिकृत मोबाइल टॉवर प्रकरणी अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. कोणतीही परवानगी न घेता मोबाइल कंपनीने थेट शाळेच्या इमारतीवरच मोबाइल टॉवर उभारल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची लाट पसरली होती. या टॉवरच्या इलेक्ट्रोमॅग्नेटीक लहरींचा शाळकरी मुले, परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत होता. सीबीडी परिसरातील मोबाइल टॉवरवर कारवाई करताना टाऊन प्लॅनिंग तसेच अतिक्रमण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.