मोबाइल तिकीट सप्टेंबरमध्ये
By Admin | Updated: July 31, 2015 09:29 IST2015-07-31T03:13:48+5:302015-07-31T09:29:50+5:30
पश्चिम रेल्वे मार्गावर पेपरलेस मोबाइल तिकीट नुकतेच सुरू करण्यात आले. मात्र मध्य रेल्वे मार्गावर या सेवेला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. इस्रोकडून काही तांत्रिक प्रश्न सोडवण्यात येत

मोबाइल तिकीट सप्टेंबरमध्ये
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर पेपरलेस मोबाइल तिकीट नुकतेच सुरू करण्यात आले. मात्र मध्य रेल्वे मार्गावर या सेवेला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. इस्रोकडून काही तांत्रिक प्रश्न सोडवण्यात येत असून त्यासाठी एक महिन्याचा कालावधी मागण्यात आला आहे. त्यामुळेच मध्य रेल्वेवर पेपरलेस मोबाइल तिकीट सेवा सुरू होण्यास सप्टेंबर महिना उजाडणार आहे.
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर मोबाइल तिकीट सेवेची सुरुवात गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंच्या हस्ते करण्यात आली. या सुविधेत मोबाइलवर तिकीट आल्यानंतर त्याची प्रिंट स्थानकातील एटीव्हीएम मशिनमधून घ्यावी लागत असल्याने प्रवाशांना त्याचा मोठा मनस्ताप होत होता. त्यामुळे यात बदल करत ही सेवा पेपरलेस करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मोबाइलवर आलेले तिकीट ग्राह्य धरण्याची सुविधा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम रेल्वे उपनगरीय प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली. तिकीट घेण्यासाठी रेल्वेकडून भौगोलिक क्षेत्र निर्धारित करताना ज्या स्टेशनवरून प्रवाशाला प्रवास करायचा आहे त्याच्या दोन किलोमीटर परिसरात प्रवाशाने असावे. तसेच स्टेशन इमारत परिसर किंवा ट्रॅकपासून ३0 मीटरच्या बाहेर असणे गरजचे आहे. ही सेवा सुरू होताच पश्चिम रेल्वेवर नवी प्रणाली डाऊनलोड करण्याचे प्रमाण अधिक झाले. तर तिकीट काढण्याचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आल्याने ते प्रमाण वाढवण्यावर भर दिला जात आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर सेवा सुरू झाल्यानंतर मध्य रेल्वेवर ती सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या सेवेला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. ही सेवा सुरू करतानाच तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी इस्रोकडून (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) मदत घेण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवरील तांत्रिक अडचणी सोडवल्यानंतर आता मध्य रेल्वेवरील तांत्रिक प्रश्न सोडवण्यासाठी इस्रोची मदत घेण्यात येत आहे. यासाठी एक महिना इस्रोकडून मागण्यात आला असून तो संपल्यानंतर सप्टेंबर महिन्यात पेपरलेस मोबाइल तिकीट सेवा सुरू होईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली. पश्चिम रेल्वेचा उपनगरीय मार्ग हा सरळ रेषेत आहे. मध्य रेल्वेची मेन लाइन, हार्बर आणि ट्रान्स हार्बर लाइन तसे नसल्यानेच तांत्रिक प्रश्न उद्भवला आहे. यांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे आणि त्यामुळे इस्रोकडून याबाबतचे काही प्रश्न सोडवण्यात येत असून त्यासाठी एक महिना लागणार असल्याचे इस्रोकडून रेल्वेला सांगण्यात आल्याचे पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)