Join us

इथे मिळेल मोबाइल चार्जिंग, एटीएम अन् सॅनिटरी नॅपकिन; पालिका उभारणार स्मार्ट सार्वजनिक शौचालये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 13:17 IST

 शहर आणि उपनगरात खासगी संस्थांच्या मदतीने सर्व सुविधांनी युक्त अशी स्मार्ट सार्वजनिक स्वच्छतागृहे महापालिका उभारणार आहे.

मुंबई :  शहर आणि उपनगरात खासगी संस्थांच्या मदतीने सर्व सुविधांनी युक्त अशी स्मार्ट सार्वजनिक स्वच्छतागृहे महापालिका उभारणार आहे.  एटीएम, मोबाइल चार्जिंग, स्तनपान सुविधा, सोलर पॅनेल सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशीन आदी सुविधा या स्वच्छतागृहामध्ये असणार आहेत. स्त्री, पुरुष यांच्यासोबत तृतीयपंथीसाठी स्वतंत्र असे हे स्वच्छतागृह असणार आहे. दरम्यान, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे उभारण्यात येणाऱ्या या स्वच्छतागृहांसाठी महापालिकेकडून स्वारस्य प्रस्ताव मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

गोरेगाव ( पूर्व ) भागातील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विरवाणी इंडस्ट्रियल इस्टेट जवळ मल्टीस्पेशालिटी स्वच्छतागृह बांधण्यात येत आहे. स्त्री, पुरुष व तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र शौचालय सुविधा, महिलांसाठीच्या शौचालयात सॅनेटरी नॅपकिन वेडिंग मशीन, बाळांना स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष, बाळांचे डायपर बदलण्यासाठी जागा, पिण्याच्या पाण्याची सोय, मोबाइल चार्जिंग स्टेशन आणि पेय पदार्थांसह ‘एटीएम’ची देखील सुविधा मिळणार आहे.  या उत्तम सुविधांमुळे ही शौचालये खऱ्या अर्थाने स्मार्ट होणार आहेत. 

३,६०० म्हाडाची स्वच्छतागृहे आहेत. ३,२०१ २४ विभागांतील झोपडपट्ट्या, वस्ती, चाळींमध्ये पुरुष आणि महिलांसाठी पालिकेची स्वच्छतागृहे आहेत. ८४० ‘पैसे द्या, वापरा’ या तत्त्वावर रहदारी असणाऱ्या रस्त्यांवर स्वच्छतागृह उभारण्यात आली.

आणखी कोणत्या सुविधा देणार

मुंबईत आणखी स्मार्ट सार्वजनिक शौचालय उभारले जाऊ शकतात का आणि त्यामध्ये आवश्यक सुविधा देणे शक्य आहे का, यासाठी महापालिकेने स्वारस्य प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. येत्या १९ जूनपर्यंत या संदर्भातील स्वारस्य प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम मुदत महापालिकेकडून देण्यात आली आहे. ज्या खास संस्था किंवा कंपन्या यात स्वारस्य दाखवणार त्यांच्याकडूनच स्मार्ट शौचालयात नेमक्या कोणत्या सुविधा आरेखन, बांधा, अर्थसहाय्य देऊ शकणार याबाबतची माहिती मागविण्यात आली आहे.