Join us  

अबब! व्यवस्थापकाला आले २० लाखांचे मोबाइल बिल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 6:50 AM

ग्राहकांच्या नोंदणीसाठी ठेवलेला टॅब हॅक करून, जपानी आणि कोरियन भाषेतील सुमारे २१ हजार संदेश पाठवून कंपनीच्या व्यवस्थापकाला २० लाखांचे मोबाइल बिल आल्याने खळबळ उडाली.

मुंबई : ग्राहकांच्या नोंदणीसाठी ठेवलेला टॅब हॅक करून, जपानी आणि कोरियन भाषेतील सुमारे २१ हजार संदेश पाठवून कंपनीच्या व्यवस्थापकाला २० लाखांचे मोबाइल बिल आल्याने खळबळ उडाली. या प्रकारामुळे व्यवस्थापकाने पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.विक्रोळी पार्कसाइट परिसरातील कैलास बिझनेस पार्कमध्ये तक्रारदार इन्व्हेट कंपनीचे कार्यालय आहे. मुंबईतील चार मैदाने त्यांनी कंत्राट पद्धतीने घेतली आहेत. या मैदानांवर ते विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. मैदानांचे बुकिंग घेण्यासाठी कंपनीने डिसेंबर २०१७ पासून एक टॅब ठेवला असून, यात एअरटेल कंपनीची दोन पोस्टपेड सिम कार्ड घातली आहेत.अशात आॅगस्ट महिन्यात २० लाख ४५३ रुपयांचे बिल पाहून त्यांच्या भुवया उंचावल्या. त्यांनी याबाबत सिम कार्ड कंपनीकडे चौकशी केली, तेव्हा टॅबमधून जपानी आणि कोरियन भाषेतील सुमारे २१ हजार संदेश ८१, ९० या सीरिजला पाठविण्यात आल्याचे दिसून आले. मात्र, कंपनीने असे कुठल्याही स्वरूपाचे संदेश पाठविले नसताना, कोणीतरी टॅब हॅक करून हा प्रताप केल्याचा संशय कंपनीला आला. त्यानुसार, त्यांनी थेट पवई पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :मोबाइलमुंबई