महापालिका निवडणुकांसाठी मनसेच्या टीम -

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:12 IST2021-01-13T04:12:31+5:302021-01-13T04:12:31+5:30

महापालिका निवडणुकांसाठी मनसेच्या टीम - राज ठाकरे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी महाराष्ट्र ...

MNS team for municipal elections - | महापालिका निवडणुकांसाठी मनसेच्या टीम -

महापालिका निवडणुकांसाठी मनसेच्या टीम -

महापालिका निवडणुकांसाठी मनसेच्या टीम - राज ठाकरे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्त्वाची बैठक पार पडली. महापालिका निवडणुकांसाठी शहरानुसार टीम तयार करण्याची सूचना पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी या वेळी दिली.

वांद्रे येथील एम.आय.जी. क्लब येथे झालेल्या बैठकीत पक्षाचे नेते, सरचिटणीस आणि महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. राज यांनी महानगरपालिकांनुसार टीम स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. आगामी काळात जिथे निवडणुका लढवायच्या आहेत अशा शहरांसाठी या टीम असतील. यात पक्षाचे नेते, सरचिटणीस, उपाध्यक्ष, कार्यकर्ते यांचा समावेश असेल. सध्या मनसेत बैठकांचे सत्र सुरू आहे. आजच्या बैठकीनंतर बुधवारीही राज ठाकरे यांनी आपल्या कृष्णकुंज निवासस्थानी बैठक घेणार असल्याचे समजते. दरम्यान, विविध आघाड्यांच्या प्रमुखांना अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार संबंधित पदाधिकाऱ्यांनी आपले अहवाल राज ठाकरे यांच्याकडे सादर केले.

येत्या काही महिन्यांत राज्यात पाच महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्याशिवाय, मुंबई महापालिकेची निवडणूक वर्षभरावर आली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारचा नवीन राजकीय प्रयोग सुरू झाल्यानंतर तयार झालेली राजकीय संधी साधण्यासाठी मनसेही तयारीला लागली आहे. मराठीसह विविध मुद्द्यांवर स्थानिक कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त आंदोलने सुरू आहेत. त्याला आता राजकीय कार्यक्रमांचे स्वरूप देण्याबाबत पक्षात विचारविनिमय सुरू आहे. शिवाय, सर्व आढावा घेतल्यानंतर पुढील राजकीय मांडणी केली जाणार आहे. यात स्वबळावर वाटचाल की युती आदी बाबींचा समावेश असेल.

दरम्यान, मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास राज ठाकरे एम.आय.जी. क्लबमध्ये बैठकीसाठी दाखल झाले. त्यांच्या डाव्या हाताला प्लॅस्टर होते. सोमवारी टेनिस खेळताना दुखापत झाल्याचे समजते.

.....................................................

Web Title: MNS team for municipal elections -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.