Join us  

मनसेचा 'पद्मावत'ला पाठिंबा; संरक्षणासाठी सज्ज !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 4:59 PM

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ला देशभरातील अनेक राज्यांमध्ये करणी सेनेने विरोध केलेला असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या वादात उडी घेतली आहे.

- गौरीशंकर घाळे

मुंबई : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ला देशभरातील अनेक राज्यांमध्ये करणी सेनेने विरोध केलेला असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या वादात उडी घेतली आहे. " ‘पद्मावत’ला सेन्सॉर बोर्ड आणि सुप्रीम कोर्टाने दिलासा-परवानगी दिलेली असतानाही करणी सेनेने त्याला विरोध करणं चुकीचं आहे, या सिनेमाच्या रिलीजला विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक देणं तर निश्चितच चुकीचं आहे," असं सांगत मनसेच्या सरचिटणीस व महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा (working president) शालिनी ठाकरे यांनी "मुंबईसह महाराष्ट्रात ‘पद्मावत’ प्रदर्शित होण्यासाठी आवश्यकता भासल्यास मनसे सज्ज असेल," असं मत व्यक्त केलं आहे. 

सुप्रीम कोर्टाने पद्मावत सिनेमा सर्व राज्यांमध्ये रिलीज करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र गुजरातमध्ये हा सिनेमा रिलीज न होण्याची चिन्हं आहेत. कारण नुकसानीच्या भीतीने मल्टीप्लेक्स मालकांनी सिनेमा रिलीज न करण्याचा निर्णय घेतला आहे. "देशाचे पंतप्रधान ज्या राज्याचे आहेत, त्या राज्यातच जर कायदा व सुव्यवस्था राखली जाणार नसेल, त्या राज्यातच जर सिनेमा प्रदर्शित होणार नसेल तर इतर राज्यांमध्ये कायदा-सुव्यवस्थेची किती वाईट स्थिती असेल, याचा विचारही करवत नाही" अशी टीकाही शालिनी ठाकरे यांनी केली. 

सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीनंतरही राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि हरियाणा या भाजपशासित राज्यांमध्ये 'पद्मावत'च्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. या विरोधात सिनेमाच्या निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. निर्मात्यांना दिलासा देत सिनेमा सर्व राज्यांमध्ये प्रदर्शित करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला. तरीही करणी सेना 'पद्मावत' सिनेमाला अनावश्यक विरोध करत आहे. याविषयी मनसेची भूमिका मांडताना शालिनी ठाकरे म्हणाल्या,"महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेनेही काही सिनेमांना विरोध केला होता, मात्र आजवर कधीही कोणत्याही चित्रपटाच्या आशयावर आम्ही आक्षेप घेतलेला नाही. एखाद्या सिनेमात मुंबई ऐवजी बाॅम्बे शब्द वापरला गेला असेल किंवा आपल्या शत्रुराष्ट्राच्या पाकिस्तानी कलावंतांनी भूमिका केली असेल, तरच आम्ही आक्षेप घेतला आहे. संजय लीला भन्साळी यांच्याच 'बाजीराव' या सिनेमाबाबत पुण्यातील अनेक संघटनांनी आक्षेप घेतला होता, पण मनसेने 'बाजीराव' सिनेमाला कधीही विरोध केला नाही. ऐतिहासिक सिनेमांना विरोध करणा-या लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, असे सिनेमे म्हणजे काही ऐतिहासिक माहितीपट Historic Documentary नसतात. सिनेमा बनवताना लेखक-दिग्दर्शक काही प्रमाणात का होईना सिनेमॅटिक लिबर्टी घेणारच."मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जर पद्मावत प्रदर्शिक होण्यापासून रोखण्याचा कुणी प्रयत्न केला, तर मनसे या सिनेमाच्या दिग्दर्शक-कलावंतांच्या संरक्षणासाठी सक्षम आहे, असंही शालिनी ठाकरे यांनी सांगितलं.

टॅग्स :संजय लीला भन्साळीपद्मावतमनसे