Join us

"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 17:46 IST

Raj Thackeray: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अटल सेतूला जोडणाऱ्या शिवडी - वरळी उन्नत रस्ता प्रकल्पांतर्गत मध्य व पश्चिम ...

Raj Thackeray: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अटल सेतूला जोडणाऱ्या शिवडी - वरळी उन्नत रस्ता प्रकल्पांतर्गत मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावरील १२५ वर्षे जुना एल्फिन्स्टन ब्रिज पाडण्याचा निर्णय घेतला आहे. या पुलाच्या कामासाठी १९ इमारतींमधील पुनर्वसन करण्यात येणार आहे तसेच दोन बाधित इमारतीमधील रहिवाशांना तिथेच घर देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र त्यानंतरही एल्फिन्स्टन पूल पाडण्याच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर पुलाजवळील रहिवाशांना घरे खाली करण्याच्या नोटीस येत असल्याने नागरिकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी एल्फिन्स्टन पुलाजवळील रहिवाशांना धीर दिला.

अटल सेतूला जोडणाऱ्या प्रस्तावित वरळी-शिवडी उन्नत रस्त्यासाठी एल्फिन्स्टन पूल पाडण्याच्या निर्णयाला नागरिकांचा विरोध सुरुच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानंतरही याप्रकरणी नागरिकांकडून कोर्टात धाव घेण्यात आली. कोर्टाने एल्फिन्स्टन पूल पाडण्याविरोधातील याचिकाकर्त्याचे आक्षेप विचारात घेण्याचे आदेश एमएमआरडीएला दिले आहेत. त्यानंतरही घरे खाली करण्य‍ाची नोटीस शासनाकडून देण्यात आल्याने नागरिकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी जे तुमची घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या असं म्हटलं. मनसेच्या अधिकृत एक्स पेजवरुन या भेटीची माहिती देण्यात आली.

"जे तुमची घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या! मुंबईतील एल्फिन्स्टन पुलाजवळील रहिवाशांना घरे खाली करण्य‍ाची शासनाकडून नोटीस देण्यात आली मात्र घरांची पुढील परिक्रमा कशी असेल, स्थलांतरीत घरे देण्याची माहिती न देता नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार सुरु होताच स्थानिकांनी मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांना भेटून व्यथा मांडली. राजसाहेबांनी या प्रकरणात नागरिकांना धीर देऊन "जो कोणी येईल त्याला सांगा राज ठाकरेंशी बोलणं झालंय. योग्य माहिती मिळाल्याशिवाय घरं खाली होणार नाहीत अशी तंबीही दिली," असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

टॅग्स :राज ठाकरेमुंबईमुंबई महानगरपालिका