Join us

रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 12:32 IST

प्रत्येक शहराचे काही नियम असतात आणि ते पाळले पाहिजेत असं म्हणत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा परप्रांतियांच्या मुद्द्यावरुन भाष्य केलं आहे.

Raj Thackeray: बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसेच्या उत्कर्ष पॅनेलचा दारूण पराभव झाला. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले होते. जवळपास ५० मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. पतपेढीच्या निवडणुकीच्या पराभवानंतर लगेचच राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी गेल्याने राजकीय वर्तुळातच चर्चांना उधाण आलं होतं. मात्र राज ठाकरे यांनी मुंबईतील वाहतुकीच्या गंभीर मुद्द्यावरुन भेट घेतल्याचे समोर आलं आहे. राज ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टाऊन प्लॅनिंगसंदर्भातील एक आराखडा दिला. 

गुरुवारी सकाळी मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी काही मनसे नेते देखील उपस्थित होते. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत भेटीचे कारण सांगितले.  प्रत्येक शहराचे काही नियम असतात आणि ते पाळले पाहिजेत, गाडी पार्क करण्यासाठी पार्किंग लॉट उभे करण्याची गरज आहे असं राज ठाकरे म्हणाले. तसेच यावेळी मुंबईत येत असलेल्या लोकांच्या लोंढ्यांच्या मुद्द्यावरूनही राज ठाकरेंनी भाष्य केलं.

"मुंबई आणि आसपासच्या शहरात आता पुनर्विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. ज्याठिकाणी ५० माणसे राहत होती, आता तिथे ५०० माणसे आली आहेत. त्यांच्या गाड्या वाढल्या, कचरा वाढला. हे सर्व आता रस्त्यावर येत असून त्यामुळे शहराचा बट्ट्याबोळ होतोय. आपण कबूतर, हत्ती यासांरख्या विषयात अडकलोय. महत्त्वाच्या विषयांवर आपले दुर्लक्ष होत आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. रस्त्यावर कशाही पद्धतीने वाहने उभी केली जात आहेत. पार्किंगच्या समस्येकडे आपण डोळसपणे पाहत नाही आहोत. याच संदर्भात आज मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना आराखडा दिला आणि  काही नमुने सांगितले," असं राज ठाकरे यांनी म्हटलं. 

"परवा मोनो तिरकी झाली. रोज या शहरांवर माणसं आदळत आहेत. रस्ते मोठे होत नाहीयेत. इमारती वरती चालल्या आहे.त ब्रिज कँडी येथे पार्किंग लॉट तयार करण्यात आला होता. पण दबाव आणून तो काढायला लावला. वरतून जे धन दांडगे येतात आणि म्हणतात आमच्या समोर पार्किंग नको. तुमच्यासमोर पार्किंग नको म्हणजे काय. जगामध्ये अशा प्रकारे लोकांना घेऊन जाणारी मुंबई लोकल ही पहिली गोष्ट असेल. ज्या प्रकारे लोकलमध्ये रोज लोक प्रवास करतात ते थक्क करणारे आहे. ही माणसं येणारी थांबवली पाहिजेत. आपल्याकडे कुंपनच शेत खात आहे, सरकारी जमीनीवर झोपडपट्टी उभी होते, मात्र गोदरेजची तशीच आहे. बाहेरच्या राज्यांमध्ये शहर तुम्हाला डेव्हलप करावी लागतील. माणसं शहरात येणे थांबवणे हे गरजेचे आहे. आपल्या हातात जेवढ्या गोष्टी आहेत त्या सुरू केला पाहिजे," असं राज ठाकरे म्हणाले.

"ज्यांना तुम्ही गाड्यांचे लायसन देता त्यांना गाडी कुठे पार्क करायची हे शिकवले जात नाही. कोणत्याही प्रकारची भीती नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत. सरकार अशा बाबतीत नको तिकडे भीती दाखवत आहे. अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा," असंही राज ठाकरे म्हणाले.

टॅग्स :राज ठाकरेदेवेंद्र फडणवीसमुंबईवाहतूक कोंडी