गुजराती वर्तमानपत्राच्या जाहिरातीला मनसेचा आक्षेप
By Admin | Updated: May 9, 2014 15:49 IST2014-05-09T15:49:42+5:302014-05-09T15:49:42+5:30
शिवसेनेच्या मुखपत्रातून गुजराती समाजावर निशाणा साधला असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रडारवरही गुजराती आले आहेत. बेस्ट बसेसवरील गुजराती जाहिरातींवर मनसेने आक्षेप घेतला आहे.

गुजराती वर्तमानपत्राच्या जाहिरातीला मनसेचा आक्षेप
>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. - शिवसेनेच्या मुखपत्रातून गुजराती समाजावर निशाणा साधला असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रडारवरही गुजराती आले आहेत. बेस्ट बसेसवरील गुजराती जाहिरातींवर मनसेने आक्षेप घेतला आहे. या जाहिरातींवरुन बेस्ट समितीच्या बैठकीत सत्ताधा-यांना धारेवर धरण्याची तयारीही मनसे नेत्यांनी सुरु केली आहे.
मुंबईत नव्याने सुरु होणा-या एका गुजराती वृत्तपत्राची बेस्ट बसवर जाहिरात झळकली होती. या जाहिरातींमध्ये मुंबईला घडवण्यात गुजराती समाजाचा हातभार होता असा आशय होता. यामुळेच मनसेने या जाहिरातीला तीव्र आक्षेप घेतल्याचे समजते. दरम्यान, हा वाद आणखी चिघळू नये यासाठी बेस्ट प्रशासनाने तातडीने या जाहिराती काढून टाकल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मराठी विरुध्द गुजराती असा नवीन वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र दिनी शिवसेनेने सामना या मुखपत्रातून गुजराती समाजावर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना गुजरातींविरोध नसल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले होते. यापाठोपाठ आता मनसेनेही गुजराती जाहिरातींवर आक्षेप घेतल्याने विधानसभा निवडणुकीत गुजराती विरुध्द मराठी हा मुद्दा शिवसेना - मनसेच्या राजकीय अजेंड्यावर असेल असे चित्र निर्माण झाले आहे